Helicopter Pull Ups : सुदृढ आणि सुडौल शरीरयष्टी (Fit body) मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. काहीजण त्यासाठी आपल्या आहारात बदल करतात, तर काहीजण जिममध्ये जाऊन घाम गाळणं पसंत करतात. काहीजण धावण्याचा, सायकलिंगचा सराव वाढवत नेऊन आपलं वजन कमी करण्यााठी प्रयत्नशील असतात. अशाच वेगवेगळ्या प्रकारे स्वतःचीच क्षमता वाढवणारे आणि नवीनवी आव्हानं पेलू पाहणारे दोन तरुण सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या दोघांनीही आपल्या कामगिरीनं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. हेलिकॉप्टरला (Helicopter) लटकून एका मिनिटांत किती पुलअप्स मारता येऊ शकतात, याबाबत आतापर्यंतचं जे रेकॉर्ड (World Record) होतं, ते एकानं मोडलं आणि लगेचच त्याच्यापेक्षा एक जास्त पुलअप मारत दुसऱ्याने आतापर्यंतच्या सर्वोच्च विक्रमाची नोंद केली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या (Guinness book of world record) अधिकृत यूट्यूब हँडलवरून याचा व्हिडिओ रीलिज करण्यात आला आहे.
बेल्जियममध्ये हा नवा विक्रम नुकताच नोंदवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अर्जेन अल्बर्स आणि स्टेन ब्राऊनी या दोन यूूटूबर्स असलेल्या तरुणांनी हा विक्रम रचला आहे. हे दोघंही फिटनेस इन्फुएन्सर्स म्हणून यूट्यूबवर प्रसिद्ध असून त्यांचे लाखो चाहते आणि फॉलोअर्स आहेत. वेळोवेळी फिटनेसबाबतचे व्हिडिओ ते पोस्ट करत असतात आणि नागरिकांना व्यायामासाठी उद्युक्त करण्याचं काम करत असतात. मात्र लोकांना ज्ञान देताना ते स्वतःदेखील किती फिट आहेत, हे त्यांनी या व्हिडिओतून दाखवून दिलं आहे. आतापर्यंतचा हेलिकॉप्टरला लटकून पुलअप्स मारण्याचा विक्रम या दोघांनी मोडला आहे.
अधिक वाचा - Video of lightning : ढगातून अशी पडते जमिनीवर वीज! हा व्हिडिओ पाहून अनेकांचा बसेना डोळ्यावर विश्वास
याअगोदर हेलिकॉप्टरला लटकून एका मिनिटांत 23 पुलअप्स मारण्याच्या विक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होती. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगोदर एल्बर्सने पुलअप्स मारायला सुरुवात केली. एका मिनिटात त्याने 24 पुलअप्स मारले आणि आधीचा विक्रम मोडला. मात्र हा विक्रम केवळ काही मिनिटंच त्याच्या नावावर राहू शकला. त्यानंतर पुलअप्स मारायला सुरुवात केली स्टेनने. त्याने तर एका मिनिटांत तब्बल 25 पुलअप्स मारले आणि एल्बर्सचा विक्रम मोडून टाकला. सध्या हे दोन्ही तरुण या प्रकारात पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी नोंदवले गेले असून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
अधिक वाचा - Viral News : काय म्हणता? गूगलमुळे देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री!
व्यायामाची प्रेरणा देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. ज्या सराईतपणे या तरुणांनी हेलिकॉप्टरला लटकून पुलअप्स मारले, त्यातून किती दीर्घकाळ त्यांनी यासाठी तयारी केली असावी, याची प्रचिती येते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेकांनी या दोघांचं अभिनंदन केलं आहे.