flossie worlds oldest cat says guinness world records : जगातील सर्वात 'सिनिअर' मांजर हा मान फ्लॉसी नावाच्या मांजरीला मिळाला. या मांजरीचा जन्म 29 डिसेंबर 1995 रोजी झाला. यंदा गुरुवार 29 डिसेंबर 2022 रोजी फ्लॉसी मांजर वयाची 27 वर्षे पूर्ण करेल. एवढे प्रदीर्घ आयुष्य जगलेली फ्लॉसी ही जगातील एकमेव मांजर आहे. या मांजरीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे. अलिकडेच फ्लॉसीच्या मालकीणीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतलेल्या नोंदीची माहिती एका प्रमाणपत्रासोबत देण्यात आली. या प्रमाणासोबतचे फ्लॉसी मांजरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फ्लॉसी मांजर तिची मालकीण विकी ग्रीन सोबत राहते. पोटभर दर्जेदार पदार्थ खाणे आणि पुरेशी झोप घेणे हे फ्लॉसीच्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे विकी सांगते.
एरवी मांजर एवढी वर्षे जगत नाही. पण फ्लॉसी 29 डिसेंबर रोजी वयाची 27 वर्षे पूर्ण करेल. वयाच्या या टप्प्यावर फ्लॉसी निरोगी आहे. फ्लॉसीच्या आयुष्यात अनेक चढउतार येऊन गेले. पण फ्लॉसीने या सगळ्या परिस्थितीतून हुशारीने मार्ग काढला.
Viral Video: बॉडी बिल्डर वधू-वर स्टेजवरच दाखवू लागले ताकद, व्हिडिओ होतोय व्हायरल
फ्लॉसीचा जन्म इंग्लंडमध्ये मेरीसाइडच्या एका गल्लीत झाला. परिसरातल्या एका हॉस्पिटल वर्करने एक दिवस फ्लॉसीला बघितले आणि थेट स्वतःच्या घरी नेले. जवळपास 10 वर्ष फ्लॉसी हॉस्पिटल वर्करच्या घरात होती. पण हॉस्पिटल वर्करच्या मृत्यूनंतर फ्लॉसीची रवानगी हॉस्पिटल वर्करच्या बहिणीच्या घरी झाली. तिथे ती 14 वर्ष होती. पण मालकीणीच्या मृत्यूनंतर तिची रवानगी एका तिसऱ्या व्यक्तीकडे झाली. एव्हाना 24 वर्षांची झाल्यामुळे फ्लॉसीच्या संगोपनाचे स्वरुप बदलले होते. फ्लॉसीच्या नवा मालकाला ही परिस्थिती हाताळणे कठीण वाटू लागले. अखेर संबंधित मालकाने एका स्वयंसेवी संस्थेकडे फ्लॉसीची रवानगी केली. कॅट्स प्रोटेक्शन नावाच्या या संस्थेने फ्लॉसीला सांभाळण्यास सुरुवात केली.
कॅट्स प्रोटेक्शन या स्वयंसेवी संस्थेत विकी ग्रीन वृद्ध मांजरांना हाताळणारी तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. तिनेच काही दिवसांनी संस्थेकडून परवानगी घेऊन फ्लॉसीला स्वतःच्या घरी नेले आणि तिथे सांभाळण्यास सुरुवात केली.
दीर्घायुषी फ्लॉसीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली. या नोंदीची माहिती मिळताच विकी ग्रीनला प्रचंड आनंद झाला. कारण फ्लॉसी आपल्या घरात असताना तिने हा विक्रम केला आहे, असे विकी म्हणाली. विकीला फ्लॉसीसोबत खेळणे आवडते. या खेळात विकी आणि फ्लॉसीचा भरपूर वेळ मजेत जातो. फ्लॉसी आणखी काही वर्ष जगावी आणि तिचे उर्वरित आयुष्य आनंदात जावे विकीची इच्छा आहे.