नोकरीवरून काढून टाकल्यानंतर महिलेचा 'शोले स्टाइल' राडा, पाहा काय घडलं...

व्हायरल झालं जी
Updated May 28, 2019 | 16:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

नोकरीवरून अचानक काढून टाकल्याने एका महिलेने 'शोले स्टाइल' राडा केला. अखेर पोलिसांना पाचारण केल्यानंतर हा सगळा गोंधळ थांबला.

girl_on_rooftop_thinkstock
नोकरीवरून काढून टाकल्यानंतर महिलेचा 'शोले स्टाइल' राडा (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Thinkstock

नवी दिल्ली: कुणाचीही नोकरी गेली तर ती व्यक्ती सहाजिकच खूप निराश होतं. नेमकं काय करावं असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा असतो. त्याचवेळी भविष्याची चिंता देखील त्याला सतावत असते. अशा वेळी ती व्यक्ती नेमकं काय पाऊल उचलेल याबाबत कुणीही सांगू शकत नाही. पण हरियाणातील सायबर सिटी अशी ओळख असलेल्या गुरूग्राममध्ये एका महिलेला नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर तिने जे काही केलं तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेला कामावरून कमी केल्यानंतर तिने थेट ऑफिस असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन प्रचंड धिंगाणा केला. ही महिला बिल्डिंगच्या टेरेसवर गेली आणि तेथून खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागली. खरं तर महिलेला नोकरीवरून काढून टाकल्याने तिने हा धिंगणा घातला होता. अखेर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावं लागलं. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर अखेर हा सगळा प्रकार थांबला. 

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित महिला ही गुरूग्रामच्या सेक्टर-१८ मध्ये एका खासगी कन्सल्टेन्सी कंपनीत काम करत होती. पण काही कारणास्तव तिला कामावरून काढून टाकण्यात आलं. अचानकपणे कामावरून कमी केल्यानं या महिलेचा संताप अनावर झाला आणि प्रचंड तणावाखाली आहे. यावेळी आपला जॉब परत मिळविण्यासाठी तिने अतिशय धोकादायक पाऊल उचललं. 

आपल्य्ला कामावरून काढून टाकणाऱ्या कंपनीला चांगला धडा शिकवावा या हेतूने महिलेने थेट आत्महत्येची धमकीही दिली. ती धमकी देऊनच थांबली नाही तर थेट इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन पोहचली. यावेळी तिथून खाली उडी मारण्याची ती वारंवार धमकी देत होती. जेव्हा तिच्या ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांना याबाबत महिती मिळाली तेव्हा ते देखील तिच्या पाठोपाठ टेरेसवर पोहचले. यावेळी परिस्थितीची नेमकी जाणीव आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. 

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले त्यावेळी ही महिला आणखी जोरजोराने आरडाओरडा करू लागली. ती पोलिसांसमोर देखील आत्महत्येची धमकी देऊ लागली. जेव्हा ऑफिसमधील अधिकाऱ्यांना कळून चुकलं की, महिलेला परत कामावर घेण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही त्यावेळी त्यांनी तिला पुन्हा नोकरीवर घेण्याचं आश्वासन देखील दिलं. कंपनीतील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतरच ही महिला टेरेसवरून खाली आली. त्यानंतरच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. टेरेसवरून खाली आल्यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या घरी पाठवलं. 

या घटनेनंतर संपूर्ण कार्यालयात याचविषयी दिवसभर चर्चा सुरू होती. पोलिसांनी या महिलेविरोधात कोणताही गुन्हा सध्या तरी दाखल केलेला नाही. पण अशा प्रकारच्या घटनेमुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत धसका घेतला आहे. सध्या या संपूर्ण घटनेविषयी कार्यालयातील व्यवस्थापन विचार-विनिमय करत असून यापुढे असे प्रकार घडू नयेत याची अमंलबजावणी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी