केस कापण्यासाठी पूजा गुप्ता यांच्या डोक्यावर थुंकला जावेद हबीब

Hairstylist Jawed Habib Spits on Woman's Hair in Training Seminar, NCW Takes Note : हेअर स्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या जावेद हबीब याने कोरोना संकट सुरू असताना आणि महामारी कायदा लागू असताना एक धक्कादायक कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Hairstylist Jawed Habib Spits on Woman's Hair in Training Seminar, NCW Takes Note
केस कापण्यासाठी पूजा गुप्ता यांच्या डोक्यावर थुंकला जावेद हबीब 
थोडं पण कामाचं
  • केस कापण्यासाठी पूजा गुप्ता यांच्या डोक्यावर थुंकला जावेद हबीब
  • पूजा गुप्ता यांनी नाराजी व्यक्त केली आणि केस कापण्यास दिला नकार
  • महिला आयोगाने सुरू केली चौकशी

Hairstylist Jawed Habib Spits on Woman's Hair in Training Seminar, NCW Takes Note : नवी दिल्ली : हेअर स्टायलिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या जावेद हबीब याने कोरोना संकट सुरू असताना आणि महामारी कायदा लागू असताना एक धक्कादायक कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक सेमिनारमध्ये जावेद हबीब केस कापण्यासाठी पाणी नसेल तर काय कराल असे म्हणत पूजा गुप्ता यांच्या डोक्यावर थुंकला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

ज्या महिलेच्या डोक्यावर जावेद हबीब थुंकला त्या महिलेने हेअर कट करण्यास नकार दिला. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन महिलेने तिला आलेला वाईट अनुभव कथन केला. व्हिडीओमध्ये महिलेने स्वतःची ओळख पूजा गुप्ता अशी करुन दिली आहे. उत्तर प्रदेशमधील बडौत येथील रहिवासी असलेल्या पूजा गुप्ता तिथे स्वतःचे ब्युटी पार्लर चालवतात. 

जावेद हबीबच्या सेमिनारला (प्रशिक्षण शिबीर) पूजा गुप्ता उपस्थित होत्या. 'सेमिनारमध्ये जावेद हबीबने हेअर कट करण्यासाठी आमंत्रित केले म्हणून स्टेजवर गेले. त्यावेळी उपस्थितांना हेअर कट बाबत मार्गदर्शन करताना पाणी नसेल तर काय कराल असे म्हणत जावेद हबीब डोक्यावर थुंकला' असे पूजा गुप्ता यांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्यांना यात काहीच वावगे वाटले नाही. त्यांनी टाळ्या वाजवून आणि हसून जावेद हबीबच्या चुकीच्या वर्तनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. पण पूजा गुप्ता यांना घडलेला प्रकार पटला नाही. यामुळे त्यांनी हेअर कट करण्यास नकार दिला. या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत पूजा गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

मला केस कापायचे असतील तर मी इतरत्र कापून घेईन पण जावेद हबीब यांच्याकडे केस कापून घेण्यासाठी कधीच जाणार नाही; असे पूजा गुप्ता म्हणाल्या. त्यांनी जावेद हबीब यांच्या वर्तनाविषयी नाराजी जाहीर केली.

अनेक शहरांमध्ये जावेद हबीब यांच्या नावाने हेअर आणि ब्युटी सलून सुरू आहेत. फ्रँचायझींच्या माध्यमातून जावेद हबीब यांना प्रचंड उत्पन्न मिळत आहे. आजही देशातील अनेक दिग्गज जावेद हबीब यांच्याकडून केस कापून घेणे पसंत करतात. एवढ्या प्रसिद्ध व्यक्तीने केस कापण्याच्या निमित्ताने महिलेच्या डोक्यावर थुंकून त्या कृतीचे जाहीर समर्थन पण केले. 'थुंकीत जान आहे' असे जावेद हबीब म्हणाला. 

जावेद हबीबच्या वर्तनाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. आयोगाने जावेद हबीब यांच्या सेमिनारमधील घटनेची चौकशी सुरू केली आहे. याआधी हैदराबादमध्ये जावेद हबीबी फ्रँचायझीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत 'देव आणि देवीही जिथे केस कापण्यासाठी आणि सौंदर्य उजळावे यासाठी येतात ती जागा' अशा स्वरुपाची वाक्यरचना करुन जावेद हबीबच्या फ्रँचायझीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. 

जाहिरातीत देव आणि देवी ब्युटी पार्लरमध्ये बसलले दाखविले होते. या जाहिरातीवरुन वाद निर्माण झाला. हैदराबाद पोलिसांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याची तक्रार नोंदवून घेतली होती. यानंतर पुन्हा एकदा जावेद हबीब चुकीच्या वर्तनासाठी चर्चेत आला आहे.

जावेद हबीबने २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. पण पक्षात तो कधीही सक्रीय आढळला नाही. जावेद हबीबच्या वेबसाइटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, १९४० आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्याचे आजोबा लॉर्ड माउंटबॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांचे केस कापत होते. त्याचे वडील इंदिरा गांधी यांचे हेअर स्टायलिस्ट होते. छोटा जावेद लंडनमध्ये जाऊन आधुनिक हेअर स्टायलिस्ट होण्यासाठी प्रशिक्षण घेऊन आला. त्याने जावेद हबीब सलून नावाने अनेक शहरांमध्ये फ्रँचायझी सुरू केल्या. 

ताज्या घटनेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जावेद हबीबने सेमिनारमध्ये केलेल्या वर्तनाबाबत महाराष्ट्रातील न्हावी समाजाने नाराजी व्यक्त केली. जावेद हबीबने महिलेची तसेच संपूर्ण न्हावी समाजाची जाहीर माफी मागावी; अशी मागणी महाराष्ट्रातील न्हावी समाजाने केली आहे. लवकर माफी मागितली नाही तर जावेद हबीब विरोधात मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू; असा इशारा महाराष्ट्रातील न्हावी समाजाने दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी