Viral Video : जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं असताना स्कुटीवरून चाललेले पती आणि पत्नी अचानक पाणी भरलेल्या खड्ड्यात पडले. पावसाळा सुरू झाला की अनेक अपघातांना आमंत्रण मिळतच असतं. मात्र वाहतुकीच्या रस्त्यावर एवढा मोठा खड्डा असेल, याची त्यांना कल्पनाही आली नव्हती. आपल्या पत्नीला घेऊन जाणारा पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे स्कुटी चालवत असताना अचानक गाडीचं पुढचं चाक भल्यामोठ्या खड्ड्यात गेलं आणि काही क्षणांत दोघंही पाण्यात पडले.
अशी घडली घटना
ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील अलीगढची. अलीगढच्या किशनपूर भागात शनिवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. अलीगढच्या महापालिकेनं रस्त्यांच्या कामासाठी जागोजागी मोठमोठे खड्डे खणून ठेवले आहेत. या खड्ड्यातही पावसामुळे पाणी भरलं. भर रस्त्यात हे खड्डे खणले असल्यामुळे आणि त्यात पाणी भरल्यामुळे तिथे खड्डा असेल, असा संशयही कुणाला येत नव्हता.
CCTV फुटेज से खुली स्मार्ट सिटी के दावों की पोल, अलीगढ़ में सड़क के गड्ढे में गिरा स्कूटी सवार दंपत्ति@PreetiNegi_ @iamdeepikayadav @JyotsnaBedi @anchor_barkha #Aligarh #UttarPradesh #Pothole pic.twitter.com/Ol3iKGuKQq — Times Now Navbharat (@TNNavbharat) June 19, 2022
मेडिकलमध्ये जाताना अपघात
याच दरम्यान एक पोलीस अधिकारी आपल्या पत्नीला औषधं घेण्यासाठी मेडिकल स्टोअरमध्ये चालला होता. त्याची स्कुटी पालिकेनं खणून ठेवलेल्या आणि पावसानं पाणी भरलेल्या खड्ड्यात गेली आणि पती-पत्नी दोघंही खड्ड्यात पडले. हा खड्डा इतका खोल होता की गाडीवर नियंत्रण मिळवण्याची कुठलीही संधी पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली नाही.
अधिक वाचा - विद्यार्थिनींसोबत थिरकल्या टिचर, 'कजरा मोहब्बत वाला' गाण्यावरच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल
नागरिकांनी केली मदत
हा अपघात पाहून आजूबाजूचे नागरिक धावत त्या खड्ड्यापाशी पोहोचले आणि त्यांनी जोडप्याला मदत केली. दोघांनाही परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात देऊन खड्ड्यातून बाहेर काढलं. दोघांनाही अनेक ठिकाणी खचरटलं होतं आणि जखमा झाल्या होत्या. मुका मारही लागला होता. नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
अधिक वाचा - वय ६४ पण फुटबॉल खेळण्याचे कौशल्य पाहून भले भले चक्रावले
व्हिडिओ होतोय व्हायरल
या परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे. पावसाळ्यात देशातील बहुतांश शहरांत अशीच परिस्थिती असते. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनानं कामं सुरू केलेली असतात, मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे ती थांबवण्यात येतात. या कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे मात्र तसेच असतात. अनेकदा गटारांवरची झाकणंही गायब झालेली असतात. रस्त्यावर पाणी भरलं की पाण्याखाली नेमकं काय आहे, याचा अंदाज गाडी चालवणाऱ्यांना अजिबात येत नाही. केवळ अंदाज घेतच गाडी चालवली जाते. त्यामुळे अशा खड्ड्यांमध्ये पडून जीवघेणे अपघात होतात. अनेकदा गटाराची झाकणं गायब झाल्यामुळे किंवा उघडीच ठेवल्यामुळे पादचारीही गटारात पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.