Viral Post: मुलाने फेसबुकवर आईला दिल्या, दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा

व्हायरल झालं जी
Updated Jun 12, 2019 | 18:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Viral Post: केरळच्या एका मुलाने आईला दुसऱ्या विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या मुलाच्या या कृत्यावर सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. गोकूळ श्रीधर असं त्याचं नाव असून, त्याची पोस्ट केरळध्ये व्हायरल होत आहे.

facebook post
मुलाने आईला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Representative Image

नवी दिल्ली : आई आणि मुलाचं नातं खूप वेगळं असतं. त्याचं वर्णन शब्दांत करणं खरच खूप कठीण आहे. आईसाठी आपला मुलगा जेवढा प्रिय असतो तेवढंच प्रेम मुलगा आपल्या आईवर करत असतो. दोघांमधील प्रेम आणि जिव्हाळा खूपच संवेदनशील असतं. आईचं प्रेम मुलाला कायम तिच्याजवळ बांधून ठेवतं. असंच आई आणि मुलाचं नातं आपल्याला केरळमध्ये पाहायला मिळालं आहे. यात मुलाने आपल्या आईविषयी फेसबुकवर जे लिहिलंय त्याचं खूप कौतुक होत आहे. आजही पुनर्विवाहाकडे लोक तिरस्काराने पाहतात, घृणास्पद मानतात. त्याच समाजात आज, केरळच्या एका मुलाने आपल्या आईला दुसऱ्या विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या मुलाच्या या कृत्यावर खूपच सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. गोकूळ श्रीधर असं त्या मुलाचं नाव असून, त्यानं केलेली फेसबुक पोस्ट केरळमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

आईच्या निर्णयाचं समर्थन

गोकूळ श्रीधर हा माकपच्या एसएफआय या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे. केरळमधील कोलम जिल्ह्यातील संघटनेचे काम तो पाहतो. गोकूळच्या वडिलांनी त्याच्या आईला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याच्या आईने दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला. आईच्या या निर्णयाचं समर्थन करत गोकूळनं तिला फेसबुकवरून दुसऱ्या विवाहासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गोकूळने फेसबुक पोस्ट मल्याळम भाषेत लिहिली आहे. श्रीधरनं लिहिलं आहे की, 'माझ्या आईचं लग्न होतं. मी खूप विचार करून, ही पोस्ट लिहित आहे. सध्याचं युग असं आहे की, अजूनही लोक दुसरं लग्न स्वीकार करत नाहीत. ज्यांची नजर घृणास्पद, शंकास्पद आहे. त्यांनी ही पोस्ट वाचू नये. तुम्ही ही पोस्ट वाचलीत तरी काही फरक पडणार नाही. एका महिलेनं केवळ माझ्यासाठी तिचं संपूर्ण आयुष्य वेचलं आहे. पहिल्या लग्नानंतर तिनं खूप काही सहन केलं आहे. मारहाणीनंतर तिच्या कपाळातून रक्त यायचं. त्यावेळी मी तिला विचारायचो की तू हे का सहन करतेस? मला आठवतंय की ती केवळ माझ्यासाठी ते दुःख सहन करायला तयार असायची. जेव्हा मी तिच्यासोबत घर सोडलं तेव्हाच मी या क्षणाचा विचार करून ठेवला होता.'

फेसबुकवर कौतुक

गोकुळ पुढे म्हणाला, ‘माझी आई, तिची स्वतःची पण काही स्वप्नं होती आकांक्षा होत्या. पण, तिनं माझ्यासाठी आपलं संपूर्ण तारुण्य वाया घालवलं. मला खूप काही बोलायचं नाही. मला असं वाटतं की, या भावना अशा आहेत की ज्यांना दाबून किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. आई तुला वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.’ गोकूळची ही पोस्ट मल्याळम भाषेत असली तरी, त्या पोस्टला केवळ सहा तासांत ३१ हजार लाईक्स मिळाल्या. त्या पोस्टला आतापर्यंत ५०० जणांनी शेअर केले असून, त्यावर तीन हजार जणांच्या कमेंट्स आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Viral Post: मुलाने फेसबुकवर आईला दिल्या, दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा Description: Viral Post: केरळच्या एका मुलाने आईला दुसऱ्या विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या मुलाच्या या कृत्यावर सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. गोकूळ श्रीधर असं त्याचं नाव असून, त्याची पोस्ट केरळध्ये व्हायरल होत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola