नवी दिल्ली : तुम्ही कुल्हडचा चहा प्यायला असाल किंवा बघितला असेल, पण तुम्ही कधी विदेशी फूड पिझ्झा हा कुल्हडमध्ये पाहिला आहे का? नाही, पण हो तुमच्या आवडीचा पिझ्झा हा आता देशी अवतारात दिल्लीच्या बाजारात आला आहे. विशेष म्हणजे हा पिझ्झा खाण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. फक्त शंभर रुपयांमध्ये तुम्ही या देशी पिझ्झाची चव घेऊ शकतात.
या पिझ्झाची किंमत आणि त्याची विशेषता पाहून खुद्द पेटीएमचे संस्थापक सीईओ विजय शेखर शर्मा यांनी प्रकाश बेकरीमधील कुल्हड पिझ्झाचा फोटो शेअर केला आहे.
हा पिझ्झा स्नॅक बनवण्यासाठी पिझ्झा क्रस्ट, भाज्या, सॉस, ओरेगॅनो, चीज आणि बरेच काही कुल्हाडात भरले जाते. नंतर कुल्हाड ओव्हनमध्ये ठेवला जातो. नंतर ओव्हनमधून बाहेर आलेला कुल्हाड पिझ्झा पाहून तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मुंबईत असाल आणि तुम्हाला हा पिझ्झा खाण्याची इच्छा झाली असेल तर काय करायचा असा प्रश्न पडला असेल. तर काळजी नको कारण मुंबईतही हा पिझ्झा मिळतो. यासाठी तुम्हाला शिवाजी पार्क येथे जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला या कुल्हड पिझ्झाचा नवा प्रकार दिसेल.
दरम्यान सोशल मीडियावर हा पिझ्झा खूप व्हायरल होत आहे. जे खवय्ये आहेत, त्यांच्या खाण्यात कुल्हड पिझ्झा समाविष्ट झाला आहे. कुल्हड पिझ्झा हा भूक वाढवणारा आहे. कुल्हड (मातीचे भांडे) मध्ये पारंपारिक पद्धतीने बनवलेले आणि सर्व्ह केले जाते. हा पिझ्झा इन्स्टंट फूडचा प्रकार आहे. जो वाढदिवस किंवा किटी पार्टी, गेट-टूगेदर किंवा विशेष प्रसंगी स्नॅक म्हणून खाऊ शकतो.