Monkey attack: माकडांशी घेतला पंगा, पूर्वजांनी दिला प्रसाद! पाहा व्हिडिओ

माकडे जेव्हा मानवी वस्तीत शिरतात तेव्हा माणसांसोबतचा त्यांचा संघर्ष अटळ असतो. याच संघर्षाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Monkey attack
माकडांशी घेतला पंगा, पूर्वजांनी दिला प्रसाद!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • माणसाची माकडांशी झुंज
  • माकडांनी केला हल्ला
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Monkey attack : भारताच्या वेगवेगळ्या भागात माकडे (Monkey) मानवी वस्तीत येत असल्याच्या घटना घडत असतात. जंगले कमी झाल्यामुळे आपल्या अन्नाच्या शोधात माकडांच्या झुंडी शहरात किंवा गावात येत असतात आणि मिळेल ते पदार्थ लंपास करून आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रसंगात मानव विरुद्ध माकड असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळतो. माकडापासून काही उपद्रव होणार नाही, असं वाटत असलं तरी ही माकडं जेव्हा मानवी वस्तीत घुसखोरी करतात, तेव्हा भल्याभल्यांची भंबेरी उडताना दिसते. माकडे त्यांच्या ताकदीच्या आणि चपळाईच्या जोरावर माणसांना सळो की पळो करून सोडतात आणि या माकडांपासून सुटका करून घेण्यासाठी माणसांना अनेक उपाय करावे लागतात. सध्या माकडांशी संघर्ष करणाऱ्या एका माणसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

माकडांनी केला हल्ला

उत्तर प्रदेशातील हाथरस भागातील हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. या भागात लाल तोंडाच्या माकडांचा नेहमीच उच्छाद असतो. मानवी वस्तीत ही माकडं घुसतात आणि लहान मुलांना त्रास देत असल्याचं सांगितलं जातं. एका लहान मुलीला माकडांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर या मुलीने ओऱडायला सुरुवात केली. आपल्या मुलीचा आवाज ऐकून तिचे वडील बाहेर आले. माकडांनी आपल्या मुलीला घेरलं असून ते तिच्यावर हल्ला कऱण्याची शक्यता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तातडीने मुलीला माकडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तिकडे धाव घेतली. 

माकडांशी पंगा

माकडांना मुलीपासून दूर करण्यासाठी या व्यक्तीने त्यांच्यावर हल्लाबोल केला. जोरजोराने ओऱडत आणि रस्त्यावरील दगड माकडांवर फेकत त्याने माकडांना हाकलण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र माकडे काही त्याला दाद देईनात. एका ठिकाणाहून हाकलले की माकडे दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसत. बाल्कनीतून हाकलले की छतावर जात आणि छतावरून हाकलले की पुन्हा बाल्कनीत घुसत. 

अधिक वाचा - Viral News : ऑर्डर केलेल्या सॅण्डविचमध्ये मिळाले हजारो रुपये, त्यानंतर महिलेने केलेल्या या कृत्यामुळे लोक झाले आश्चर्यचकित

माणसावर केला हल्ला

माकडांना हाकलता हाकलता हैराण झालेल्या या व्यक्तीवर अखेर एका माकडाने रागावून हल्लाबोल केला. माकडाने छतावरून थेट माणसाच्या अंगावरच उ़डी मारली. माणसाने प्रसंगावधान राखत स्वतःला सावरले. पण माकडाने त्याला खाली पाडण्याचा आणि त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून हा माणूस सुखरूप बचावला आणि त्याने माकडांविरुद्धचा आपला लढा अविरत सुरूच ठेवल्याचं या व्हिडिओत दिसतं. 

अधिक वाचा - Viral Video: 2 तोंड आणि 4 डोळे... असा विचित्र मासा कधी पाहिलाय का?

व्हिडिओ होतोय व्हायरल

माकडे ही दुरून पाहायला छान वाटत असली तरी ज्या वस्तीत घुसतात, तिथल्या माणसांना हैराण करून सोडत असतात. या व्हिडिओखाली अनेकांनी आपापले अनुभव शेअर करायला सुरुवात केली असून कमेट्सचा पाऊस पडत आहे. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी माणसाने दाखवलेल्या डेअरिंगचं अनेकजण कौतुक करत आहेत. तर प्रशासनाने अशा स्वैर माकडांचा काहीतरी बंदोबस्त करून लहान मुलांचं आयुष्य सुरक्षित करण्याची गरज असल्याचं मतही काहीजणांनी व्यक्त केलं आहे. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी