बायकोपेक्षा मोबाईलच भारी, महागड्या फोनसाठी 17 वर्षाच्या पतीनं चक्क लग्नाच्या बायकोला विकलं; दोन महिन्यापूर्वीच केलं होतं लग्न

लग्नानंतर दोन महिन्यांनी पत्नीला राजस्थानमधल्या 55 वर्षांच्या एका व्यक्तीला 1 लाख 80 हजार रुपयांत विकल्याचा आरोप ओडिशातल्या बोलांगीर जिल्ह्यातल्या 17 वर्षांच्या किशोरवर आहे.

man sold his married wife for buy expensive Mobile phone
महागड्या फोनसाठी 17 वर्षाच्या पतीनं विकलं लग्नाच्या बायकोला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लग्नाच्या दोन महिन्यांनी पत्नीला राजस्थानमधल्या 55 वर्षांच्या एका व्यक्तीला 1 लाख 80 हजार रुपयांत विकलं.
  • 17 वर्षाच्या 24 वर्षांच्या युवतीशी ओळख सोशल मीडियावर झाली आणि दोघांनी लग्न केलं.
  • स्मार्टफोनसाठी अल्पवयीन नवऱ्याने 24 वर्षाच्या पत्नीला विकलं

ओडिशा:  दिवसेंदिवस स्मार्टफोनची क्रेझ वाढू लागली आहे. आपल्याकडे एखादा चांगला स्मार्टफोन असावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, असे महागडे फोन खरेदी करणं सर्वांनाच परवडेल असं नाही. स्मार्टफोन घेण्यासाठी काही लोक काहीही करण्यास तयार असतात. मोबाईल घेण्यासाठी ते चोरीही करू लागतात. परंतु ओडिसामध्ये मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे, एका नवरोबानं स्मार्टफोनसाठी चक्क आपल्या पत्नीला विकले आहे. दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन पतीला अटक करण्यात आली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दोन महिन्यांनी पत्नीला राजस्थानमधल्या 55 वर्षांच्या एका व्यक्तीला 1 लाख 80 हजार रुपयांत विकल्याचा आरोप ओडिशातल्या बोलांगीर जिल्ह्यातल्या 17 वर्षांच्या किशोरवर आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. असे वृत्त आज तक या वृत्तवाहिनीने दिले आहे. याबाबत बेलपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी बुलु मुंडा यांनी सांगितले की, 'अल्पवयीन किशोरची सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून 24 वर्षांच्या युवतीशी ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने विवाह करण्यास मान्यता दिली. लग्नानंतर दोन महिन्यांनी किशोरनं आर्थिक समस्या असल्याचे सांगून पत्नीला आपण दोघंही रायपूर येथे वीटभट्टीवर काम करून पैसे कमावू असे सांगितले; पण प्रत्यक्षात तो पत्नीला घेऊन राजस्थानातल्या एका गावात गेला आणि तिची विक्री केली.

या प्रकरणी पोलिसांनी किशोरला विचारले असताना त्यांने सांगितले की, 'मी माझ्या पत्नीची विक्री केली नसून, 60 हजार रुपयांसाठी तिला गहाण ठेवले आहे. मला पैशांची गरज असून सर्जरी करणेही आवश्यक आहे,` ऑगस्टमध्ये हे दाम्पत्य एका वीटभट्टीवर कामासाठी जात असल्याचे सांगून रायपूर, झाशीमार्गे राजस्थानात पोहोचले. नव्या नोकरीनंतर काही दिवसांनी किशोर याने त्याच्या पत्नीला बारान जिल्ह्यातल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला एक लाख 80 हजार रुपयांना विकले. पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितलं. परंतु, मुलीच्या पालकांना वेगळीच शंका आली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता, किशोर खोटं बोलत असल्याची शंका पोलिसांना आली.

दरम्यान, पत्नीला विकल्यानंतर किशोरने खाण्यावर मोठी रक्कम खर्च केली. तसेच त्या पैशातून महागडा स्मार्टफोन (Smartphone) खरेदी केला. तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यासाठी बोलांगीरचे एसपी नितीन कुसाळकर यांनी पथकं तयार केली. 'आम्ही किशोरची चौकशी केली. त्या वेळी त्याने पत्नीला विकल्याचं सांगितलं. युवतीचा शोध घेण्यासाठी राजस्थानला पथकं रवाना करण्यात आली', असं कुसाळकर यांनी सांगितले आहे.

ओडिशा पोलीस राजस्थानमधल्या बारान गावात युवतीच्या शोधार्थ पोहोचले असता त्यांना तिला सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. कारण ग्रामस्थ युवतीला सोडण्यास तयार नव्हते. आपण तिला 1 लाख 80 हजार रुपयांना खरेदी केल्याचं 55 वर्षांच्या व्यक्तीने या वेळी सांगितले. राजस्थान पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ओडिशा पोलिसांचे पथक युवतीला नजीकच्या पोलीस ठाण्यात नेण्यात यशस्वी झाले.  युवतीला ताब्यात घेतल्यानंतर तिने ओडिशात आई-वडिलांकडे जायची इच्छा व्यक्त केली. ग्रामस्थदेखील तिला सोडण्यास तयार झाले. अशा पद्धतीने युवतीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले. दरम्यान, किशोरला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी