Anything for Publicity | प्रसिद्धीसाठी कोण कुठल्या थराला जाईल, याचा आजकाल काहीच नेम नाही. काहीजण आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सोशल मीडियात प्रसिद्ध होतात, तर काहीजणांना आचरटपणा आणि माकडचाळे केल्यावाचून पर्याय नसतो. प्रसिद्धीच्या मागे लागलेली तऱ्हेतऱ्हेची माणसं सोशल मीडियावर दिसतात. काहीही करून लोकांचं लक्ष वेधून घेणं आणि जास्तीत जास्त लाईक्स मिळवणं, यासाठी तर काहीजण वेडे झाल्यासारखे वागत असतात. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित चव्हाण नावाच्या एका तरुणानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत तो एक कुल्फी खरेदी करताना दिसतो. कुल्फी घेतल्यावर तो स्वतःपाशी असलेला गुटखा खिशातून बाहेर काढतो. गुटख्याची पुडी फोडतो आणि ती कुल्फीवर टाकतो. त्यानंतर गुटखायुक्त कुल्फी मिटक्या मारत खाताना दिसतो. त्याचा हा प्रकार पाहून अनेक युजर्स त्याला शिव्यांची अक्षरशः लाखोली वाहत आहेत. प्रसिद्धीसाठी काहीही आचरट आणि विचित्र प्रकार सुरू असल्याची टीका युजर्सनी त्याच्या व्हिडिओखाली केली आहे.
याच तरुणाने काही दिवसांपूर्वी मॅगीमध्ये पानमसाला मिसळून खात असल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ पाहून मॅगीप्रेमी कमालीचे संतापले होते. त्यावेळीदेखील त्याच्यावर बरीच टीका झाली होती. पण टीका झाली तरी प्रसिद्धी मिळत असल्यामुळे त्याने हा प्रकार सुरूच ठेवल्याचं दिसून येत आहे. मॅगीत पानमसाला घालून खाण्याच्या प्रकाराला लोकांनी माफही केलं होतं. मात्र तेवढ्यात त्याने टाकलेल्या ताज्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओत तो दुकानातून घेतलेल्या कुल्फीवर पानमसाला टाकून खाताना दिसतो. त्यानंतर मात्र कुल्फीप्रेमी कमालीचे संतापले आहेत.
अधिक वाचा - Optical Illusion: फोटोत लपलेला प्राणी शोधताना भल्याभल्यांना फुटला घाम; तुम्हाला दिसला का?
कुल्फी आवडीने खाणारे अनेक लोक असतात. आपल्या आवडत्या पदार्थाबाबत असे विकृत प्रकार केल्यानंतर अशा व्यक्तींच्या रागाचा पारा साहजिकच चढतो. त्यातूनच अशा अनेकांनी या तरुणाला इस्टाग्रामवर अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याला किळस वाटली असं काहीजण सांगत आहेत, तर असले विकृत प्रकार करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवायला हवा, अशी अपेक्षाही काहीजणांनी व्यक्त केली आहे.
अधिक वाचा - VIDEO: धक्कादायक! पावसात अचानक झाडावर पडली भयानक वीज; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण वाट्टेल त्या थराला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात विरोधी असणारेे दोन प्रकार एकत्र करणे, त्यांच्या रेसिपी करून सोशल मीडियावर टाकणे यासारखे प्रकार वाढत आहेत. अशा विकृत प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत, अशी मागणी काही तरुण करत आहेत. तर कुणी काय खावं, हा प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा भाग असून ज्याला असे व्हिडिओ आवडत नाहीत, त्यांनी ते पाहू नये, असा युक्तीवाद तरुणाचे समर्थक आणि फॅन्स करत आहेत.