...म्हणून चितळ्यांच्या केतकीचा अभ्यासाचा सल्ला व्हायरल

marathi actress Ketaki Chitale facebook post viral मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने अभ्यासाचा सल्ला देण्यासाठी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. पण ही पोस्ट भलत्याच कारणाने व्हायरल झाली.

marathi actress Ketaki Chitale facebook post viral news
अभिनेत्री केतकी चितळे 

थोडं पण कामाचं

  • ...म्हणून चितळ्यांच्या केतकीचा अभ्यासाचा सल्ला व्हायरल
  • टीकेपाठोपाठ केतकीला आली धमकी
  • अग्रिमा जोशुआवरुन झालेली सुरुवात

मुंबईः मराठी अभिनेत्री केतकी चितळे (marathi actress Ketaki Chitale) हिने अभ्यासाचा सल्ला देण्यासाठी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. पण ही पोस्ट भलत्याच कारणाने व्हायरल झाली. पोस्टवरुन आपल्याला धमकीचे मेसेज आल्याचे केतकीने फेसबुकवर सांगितले. धमकी देणाऱ्याच्या मेसेजचे स्क्रीनशॉट तिने फेसबुकवर टाकले आहेत. यात धमकी देणारा स्वतःची ओळख कोल्हापूरमधील शिवसेनेचा एक विभागप्रमुख अशी करुन देत आहे. 

केतकी चितळेने टाकलेली फेसबुक पोस्ट

फक्त भांडण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांची नावे घेण्यापेक्षा त्यांचे विचार समजून घेण्यासाठी अभ्यास करा, अशा स्वरुपाची पोस्ट केतकीने टाकली. या पोस्टमध्ये सुरुवातीला 'शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही....' असे वाक्य आहे. ही सुरुवात काही जणांना खटकली. त्यांनी पोस्टच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा मुद्दा उपस्थित करुन केतकीवर टीका सुरू केली आहे. 

टीकेपाठोपाठ केतकीला आली धमकी

आधी टीकेपुरते मर्यादीत असलेले हे प्रकरण आता धमकीपर्यंत पोहोचले आहे. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार असताना शिवसेनेचा विभागप्रमुख असल्याचे सांगत धमकी देण्याचा प्रकार घडल्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झाल्याचे चित्र आहे. अद्याप या प्रकरणात राज्याच्या गृहमंत्रालयाची प्रतिक्रिया आलेली नाही. केतकीने पोलिसांकडे तक्रार केली आहे की नाही हे पण अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र ऐन कोरोना संकटात मराठी अभिनेत्री भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. 

अग्रिमा जोशुआवरुन झालेली सुरुवात

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यातून वाद निर्माण झाला होता. जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवाजी महाराज प्रेमींनी तिच्यावर सडकून टीका केली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यावर अग्रिमा जोशुआने व्हिडीओ डीलीट करुन माफी मागितली. मात्र ही गडबड सुरूअसताना केतकीने एकदम तरुण पिढीला अभ्यासाचा सल्ला दिला. केतकीच्या या टायमिंगमुळे तिची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली.

महेश टिळेकर यांनी घेतला समाचार

आपत्तीच्या काळात तरुण पिढी मदत करत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याप्रमाणे तरुण काम करतात. अशा वेळी केतकीने तरुणांचे कौतुक केले नाही. मग तरुणाईला नावं ठेवण्याचा अधिकार तिला कोणी दिला, अशा स्वरुपाचा प्रश्न उपस्थित करत  दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी केतकीच्या पोस्टचा समाचार घेतला. आणखी पुढे जात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे. केतकीविरोधात कारवाईची मागणी सुरू असतानाच तिने धमक्यांचे मेसेज आल्याचे जाहीर केले. त्यामुळे केतकीचा अभ्यासाचा सल्ला आता तिला महाग पडणार की सामंजस्याने हा प्रश्न सोडवला जाणार याची चर्चा सध्या सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी