Lemon Price Today in India । मुंबई : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच खाद्यपदार्थांच्या किमतींनी देखील उच्चांक गाठला आहे. लिंबूचे भाव असे वाढताहेत की लोकांचे बजेट आणि दात दोन्हीही आबंट झाल्याचे पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबाचा सर्वाधिक वापर केला जातो. मात्र आता लिंबूच्या भावामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.
अधिक वाचा : १० पट वेगाने पसरणाऱ्या XE व्हेरिएंटचा भारतात शिरकाव?
अनेक ठिकाणी एक लिंबू १० रूपयाला मिळतो. तर काही ठिकाणी एक किलो लिंबू तीनशे रूपयांच्या घरात आहे. लक्षणीय बाब म्हणजे लिंबाचा भाव गगनाला भिडला असतानाच सोशल मीडियावर वातावरण तापले आहे. युजर्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावरील काही युजर्स मजेदार मिम्स बनवत आहेत आणि त्यांच्या भावना भन्नाट मिम्सद्वारे मांडत आहेत.
ट्विटरवर #LemonPrice, #Nimbu Twitter वर टॉप ट्रेंडिंग आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक लिंबूच्या किमतीवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांनी सोनाराच्या दुकानात लिंबाचे छोटे तुकडे मिळतील असे काहींचे म्हणणे आहे. तर एका युजर्सने म्हटले की, "पूर्वी आपण लिंबू पिळत होतो आता लिंबूच आपल्याला पिळतोय. " चला तर पाहूया सोशल मीडियावर कसा चाललाय लिंबाचा भाव.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने भाजीपाला महाग झाला आहे, यात शंका नाही. आतापासूनच भाजीपाला महाग होत असल्याने आम्हालाही जास्त पैसे मोजावे लागत असल्याचे भाजीविक्री करणाऱ्या दुकानदारांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर आधी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढायचे, आता भाज्यांचेही भाव वाढल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तक्रार असली तरी ती कोणाकडे करायची? सर्वसामान्यांचे कोणी ऐकणार नाही. उन्हाळ्यात ऑफिसला जाणारे किंवा रोजंदारीवर काम करणारे लोक सहसा लिंबू सरबत पितात. मात्र लिंबाच्या दरात वाढ झाल्याने लिंबू सरबतच्या दरातही वाढ झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी लिंबू सरबतच्या गाड्या लावणाऱ्यांनी १० रुपयांऐवजी १५ रुपयांना १ ग्लास केला आहे.