'तो परत आला...' नितेश राणेंचे ट्वीट झाले व्हायरल

nitesh rane's tweet get viral 'हो किंवा नाही... तो परत आला... मुझे आवाज दो...' असे सूचक ट्वीट भाजप नेते नितेश नारायण राणे यांनी केले.

nitesh rane
'तो परत आला...' नितेश राणेंचे ट्वीट झाले व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • 'तो परत आला...' नितेश राणेंचे ट्वीट झाले व्हायरल
  • भाजप नेते नितेश नारायण राणे यांचे सूटक ट्वीट
  • ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा वापर

मुंबईः 'हो किंवा नाही... तो परत आला... मुझे आवाज दो...' असे सूचक ट्वीट भाजप नेते नितेश नारायण राणे यांनी केले. नितेश राणे यांना ट्वीटच्या माध्यमातून नेमके काय सांगायचे आहे, यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. (nitesh rane's tweet get viral)

नितेश राणेंचे 'तो परत आला...' हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी हे ट्वीट रिट्वीट केले, लाइक केले तसेच त्यावर रिप्लाय म्हणून मीम्सच्या स्वरुपात प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मारलेला टोमणा अशा दृष्टीने अनेकांनी नितेश राणेंच्या ट्वीटकडे बघितल्याचे चित्र आहे. 

कोरोना संकट नियंत्रणात येत असल्याचे दिसत होते. जानेवारी महिन्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होऊ लागली. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. मैदानांमध्ये सुरू केलेली अनेक कोविड केअर सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली. मुंबईतले सर्वात मोठे कोविड केअर सेंटरही टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अचानक परिस्थिती बदलली. फेब्रुवारीच्या १ तारखेपासून हळू हळू रुग्ण वाढू लागले. राज्याची ५० हजारांपेक्षा कमी अॅक्टिव्ह रुग्ण ही स्थिती बदलण्याच चिन्हं दिसू लागली. महाराष्ट्रात २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळपर्यंत ५२ हजार ९५६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. 

कोरोना संकटाची तीव्रता पुन्हा वाढू लागली. पण नितेश राणे यांनी कोरोना संकट परत आले हे सांगण्यासाठी ट्वीट केल्याचे दिसत नाही. कारण ट्वीटमध्ये 'हो किंवा नाही...' अशी सुरुवात केली आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो वापरलेला आहे. यामुळे कोरोना संकट परत आले हे सांगण्यापेक्षा भाषण करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परत आले आहेत हे सांगण्याच्या उद्देशाने ट्वीट केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमातून दर महिन्याला नागरिकांशी संवाद साधतात. पण कोरोना संकट सुरू झाल्यापासून भारतीयांना उद्देशून बोलण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी विशेष भाषण केले. हे भाषण सर्व सरकारी आणि खासगी वृत्त वाहिन्या तसेच फेसबुक, ट्विटर आणि यू ट्युब या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह दाखवण्यात आले. याच पद्धतीने महामारी सुरू झाल्यापासून महाराष्ट्रासह सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री वेळोवेळी आपापल्या राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील नागरिकांना उद्देशून भाषण करत आहेत. पण सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरुन प्रत्येकवेळी उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या निमित्ताने ट्रोल सुरू होतात. मीम्सचा पाऊस पडतो. नितेश राणे यांचे व्हायरल होत असलेले ट्वीट हे या घटनांच्या संदर्भात असल्याचे शक्यता व्यक्त होत आहे.

अण्णा परत येणार...

मागील काही दिवसांपासून कोकणातील अण्णा नाईक नावाच्या पात्राशी संबंधित मराठी मालिकेचा तिसरा भाग (थर्ड सीझन) सुरू होणार असल्याची जाहिरात टीव्हीवरुन सुरू आहे. या निमित्ताने 'अण्णा परत येणार, अण्णा इलं...' अशा स्वरुपाच्या मीम्स व्हायरल होत आहेत. एकीकडे हे सुरू असतानाच कोरोना संकटाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विशेष भाषणाच्या निमित्ताने टीव्हीवर दिसले. यानंतर नितेश राणे यांनी सूचक ट्वीट केले. टीव्ही मालिका, कोरोना संकटाची वाढती तीव्रता आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार करुन नितेश राणे यांनी ट्वीट केल्यामुळे हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी