कर्जात बुडालेल्या पाकिस्तानमध्ये नोटांचा पाऊस

pakistan notes showered कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानमध्ये नोटांचा पाऊस झाला. आकाशातून नोटा पडत असल्याचे पाहून पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली.

pakistan notes showered at wedding from helicopter in mandi bahauddin
कर्जात बुडालेल्या पाकिस्तानमध्ये नोटांचा पाऊस 

थोडं पण कामाचं

  • कर्जात बुडालेल्या पाकिस्तानमध्ये नोटांचा पाऊस
  • मंडी बहाउद्दीन येथे हेलिकॉप्टरमधून लाखो रुपयांच्या नोटांची उधळण
  • एकाचवेळी पुष्पवृष्टी आणि नोटांची उधळण

इस्लामाबाद: कर्जात आकंठ बुडालेल्या पाकिस्तानमध्ये नोटांचा पाऊस झाला. आकाशातून नोटा पडत असल्याचे पाहून पैसे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. प्रत्येकजण जास्तीत जास्त नोटा गोळा करण्यासाठी धडपडत होता. ही घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या मंडी बहाउद्दीन येथे घडली. याआधी पाकिस्तानमधील गुजरांवाला येथे एका उद्योगपतीने मुलाच्या विवाह सोहळ्यात वरातीवर डॉलरची उधळण केली होती. (pakistan notes showered at wedding from helicopter in mandi bahauddin)

कर्जबाजारी पाकिस्तानमधील मंडी बहाउद्दीन येथे हेलिकॉप्टरमधून लाखो रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आली. एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वरातीवर पुष्पवृष्टी आणि नोटांची उधळण एकाचवेळी करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून उधळलेल्या लाखो रुपयांच्या नोटा वाऱ्यामुळे उडत परिसरातील वेगवेगळ्या भागात पडल्या. या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. जास्तीत जास्त नोटा गोळा करण्याच्या निमित्ताने नागरिकांची एकमेकांशी हाणामारी झाली.

पाकिस्तान हा देश कर्जात आकंठ बुडाला आहे. पण पाकिस्तानमधील काही कुटुंबांतील निवडक सदस्य परदेशात व्यवसाय करतात. त्यांचे पाकिस्तानमध्येही मोठे व्यवसाय आहेत. काही जणांच्या पाकिस्तानमध्ये शेकडो एकर जमिनी आहेत. यामुळे या निवडक कुटुंबांकडे अफाट पैसा आहे. या कुटुंबांतील एखाद्या सदस्याचा विवाह सोहळा असल्यास चर्चेत राहण्यासाठी यजमान वरातीवर नोटांची उधळण करतात. ऐपतीप्रमाणे नोटांमध्ये पाकिस्तानी रुपया या चलनातील नोटा तसेच अमेरिकेचे डॉलर यांचा समावेश असतो. पाकिस्तानमध्ये विवाह सोहळ्यात नोटांची उधळण करणे, हवेत गोळीबार करणे या प्रकारांचे महत्त्व वाढत चालले आहे. प्रतिष्ठेसाठी श्रीमंतांच्या घरातील विवाह सोहळ्यात नोटांची उधळण केली जाते. स्थानिक रहिवासी नोटांची उधळण झाल्यावर पैसे गोळा करण्यासाठी धावतात. यावेळी रस्त्यावर अनेकदा हाणामारीचे प्रसंग घडतात. पण स्थानिक पोलीस या घटनेचे मूकदर्शक राहणे पसंत करतात. याच कारणामुळे पाकिस्तानमध्ये नोटांचा पाऊस पुन्हा एकदा झाला. ताजी घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या मंडी बहाउद्दीन येथे घडली.

मंडी बहाउद्दीन येथे राहणाऱ्या एका मुलाचा विवाह सोहळा होता. ज्याचे लग्न होते त्याचा एक भाऊ परदेशात असतो. तो विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये आला होता. त्यानेच हेलिकॉप्टरमधून वरातीवर पुष्पवृष्टी आणि नोटांची उधळण केली. यासाठी परदेशातून आलेल्या व्यक्तीने भाडेपट्टीवर एक हेलिकॉप्टर घेतले होते.

कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत पाकिस्तानचे नागरिक

पाकिस्तानमध्ये सार्वजनिक ठिकाणी नोटांची उधळण अथवा मोफत भोजनाची व्यवस्था असल्यास अफाट गर्दी हमखास होते. दहशतवादी कारवायांना मदत करणारा पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. अनेक देशांनी पाकिस्तानला नवे कर्ज देणे थांबवले आहे. आधी दिलेल्या कर्जाची परतफेड करावी यासाठी अनेक देशांनी पाकिस्तानकडे तगादा लावला आहे. यामुळे पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. पाकिस्तानवरील एकूण राष्ट्रीय कर्ज हे माणशी एक लाख ७५ हजार रुपये इतके प्रचंड आहे. यातील माणशी ५४ हजार ९०१ रुपयांच्या राष्ट्रीय कर्जाची भर इमरान खान सरकारमुळे पडली आहे. नोकऱ्यांचा अभाव आणि वाढती महागाई यामुळे पाकिस्तानमध्ये सामान्य नागरिक प्रचंड अस्वस्थ आहे. 

पेट्रोलियम उत्पादनांच्या दरात वाढ करण्याची शिफारस

अलिकडेच पाकिस्तानच्या तेल आणि गॅस नियामक प्राधिकरणाने इमरान खान सरकारला सर्व पेट्रोलियम उत्पादनांच्या दरात वाढ करण्याची शिफारस केली आहे. पेट्रोलचा दर एक लिटरसाठी पाच रुपये ५० पैशांनी तर डिझेलचा दर एक लिटरसाठी सहा रुपयांनी वाढवावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

पाकिस्तानमधील पेट्रोल, डिझेलचे दर

पाकिस्तानमध्ये १६ मार्च २०२१ रोजी पेट्रोल प्रति लिटर १११.९० रुपये, डिझेल प्रति लिटर ११६.८० रुपये, केरोसिन (घासलेट / रॉकेल) प्रति लिटर ८३.६१ रुपये आणि लाइट डिझेल प्रति लिटर ८१.४२ रुपये या दराने विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती इमरान खान सरकारने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी