इमरान खानचा दावा, लादेन शहीद झाला

Imran Khan calls Laden Shaheed in Parliament पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ओसामा बिन लादेन याचा नॅशनल असेंब्लीत 'शहीद' असा उल्लेख केला.

Pakistan pm Imran Khan calls Osama Bin Laden Shaheed in Parliament
इमरान खानचा दावा, लादेन शहीद झाला 

थोडं पण कामाचं

  • इमरान खानचा दावा, लादेन शहीद झाला
  • इमरान खान यांनी नॅशनल असेंब्लीत लादेनचा शहीद असा उल्लेख केला
  • इमरान यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) याच्याविषयी एक धक्कादायक दावा केला आहे. इमरान खान यांनी लादेनचा 'शहीद' असा उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) केलेल्या भाषणात इमरानने लादेनला शहीद (Shaheed) म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे.

कोण होता लादेन?

न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर (World Trade Center) प्रवासी विमानांचे अपहरण करुन ११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्यात आला होता. या घटनेसाठी अमेरिकेने लादेनला आरोपी ठरवले होते. लादेन आणि त्याच्या समर्थकांना जीवंत अथवा मृत पकडण्यासाठी अमेरिकेने मोठी लष्करी कारवाई केली. अफगाणिस्तानमध्ये त्या काळात तालिबानची (Taliban) सत्ता होती. या तालिबानने लादेन आणि त्याच्या समर्थकांच्या रक्षणाची व्यवस्था केली होती तसेच त्यांना अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित ठेवले होते. याच कारणामुळे अमेरिकेने अफगाणिस्तान विरोधात लष्करी कारवाई केली. तालिबान आणि लादेनच्या अल कायदा (Al-Qaeda) या दोन्ही दहशतवादी संघटना नष्ट करण्यासाठी अमेरिकेने ठिकठिकाणी बॉम्ब हल्ले केले. अखेर लादेनला पाकिस्तानमध्ये एबोटाबाद (Abbottabad) येथे लपवण्यात आल्याचे अमेरिकेला कळले. एकीकडे अमेरिकेच्या कारवाईना मदत करणारा पाकिस्तान लादेनला संरक्षण पुरवत असल्याचे उघड झाल्यावर अमेरिकेने थेट एबोटाबाद येथे कमांडो कारवाई करुन लादेन आणि त्याच्या अनेक सहकाऱ्यांना ठार केले. या कारवाईत लादेनच्या कुटुंबातील काही सदस्य ठार झाले तर काही सदस्यांना अमेरिकेने पकडले. पाकिस्तान सरकारला माहिती देण्याचे टाळून अमेरिकेने मोठी कारवाई केली होती. ही कारवाई झाल्यानंतर पाकिस्तानची नामुष्की झाली. परकीय सैन्य पाकिस्तानच्या जमिनीवर कारवाई करते पण पाकिस्तान त्या कारवाईला आडकाठी करू शकत नाही असे चित्र निर्माण झाले. लादेनला मारल्यानंतर अमेरिकेने मोहीम यशस्वी झाल्याचे जाहीर केले. सध्या व्हायरल होत असलेला इमरान खान यांच्या भाषणाचा व्हिडीओ या घटनेनंतरचा आहे. पण नेमका कोणत्या दिवशीचा व्हिडीओ आहे हे अद्याप समजलेले नाही.

पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीचा व्हिडीओ

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीचा लोगो दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ 'अनकट' स्वरुपातील आहे. त्यामुळे व्हिडीओ अस्सल असल्याचा दावा व्हायरल करणाऱ्यांकडून सुरू आहे.

काय म्हणाले इमरान खान?

'...हम बड़े शर्मिंदा हुए...अमेरिकी हमें बिना बताए आए और ओसामा बिन लादेन को एबटाबाद में मार दिया... उन्‍हें शहीद कर दिया।' (मराठी स्वैर अनुवाद: आमची लाज गेली... अमेरिकेने आम्हाला न सांगता एबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनला मारले... त्यांना शहीद केले) असे इमरान खान नॅशनल असेंब्लीत बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अमेरिका-पाकिस्तान मैत्रीविषयी उपस्थित केले प्रश्न

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेसोबत मैत्री केली होती. पण पाकिस्तानला यातून काय मिळाले? जगभर पाकिस्तानची निंदा झाली. पाकिस्तानची लाज गेली. पाकिस्तानने अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय टाळणे आवश्यक होते. यात आपलीच माणसं मारली गेल्याचे इमरानने नॅशनल असेंब्लीत सांगितले.

व्हिडीओ आता व्हायरल होण्यामागचे कारण अज्ञात

लादेनला २ मे २०११ रोजी मारण्यात आल्याचे अमेरिकेने जाहीर केले. या घटनेनंतर ९ वर्षांनी अचानक लादेनच्या मृत्यूचा उल्लेख असलेला इमरान खान यांचा व्हिडीओ आता व्हायरल होण्यामागचे कारण अज्ञात आहे. मात्र व्हिडीओ व्हायरल होत आहे, अनेकजण व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी