कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात आहे आणि हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र कोविडचे नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करण्याचा नियम सुद्धा आहे. अनेकदा नागरिक विना मास्क फिरताना दिसतात आणि त्यामुळे त्यांना दंडही ठोठावला जातो. दक्षिण अमेरिकेतील पेरू येथे एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. येथील एका महिलेने कोविड-१९ च्या नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे पोलीस कर्मचाऱ्याने त्या महिलेला रोखलं.
डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना पेरूची राजधानी लिमा येथील मिराफ्लोर्स बोर्डवाक येथील आहे. येथे कोविड-१९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने थांबवले. यानंतर तिचा किस घेतला आणि मग तिची सुटका केली. या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याकडून दंड आकारण्याऐवजी किस घेतला. पोलीस कर्मचारी महिलेचा किस घेत असल्याची घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
एका स्थानिक टीव्ही वाहिनीने हा व्हिडिओ टेलिकास्ट केला आहे. हे प्रकरण समोर येताच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे सुद्धा आदेश दिले आहेत. त्याचबरोबर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा दाखवत केलेल्या कृत्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात दिसत आहे की, कोविड-१९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचारी थांबवतो. यानंतर रस्त्याच्या शेजारी उभा राहून काहीतरी लिहित आहे. ही महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत बोलत आहे. याच दरम्यान पोलीस कर्मचारी आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढतो आणि तिला किस करतो. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे तर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या महिलेला दोषी ठरवलं आहे.