ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्याने वाहतूक पोलिसांनी कार चालकाला ठोठावला 27.68 लाखांचा दंड

व्हायरल झालं जी
Updated Jan 09, 2020 | 22:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

आलिशान आणि महागडी पोर्शे कारच्या मालकाला वाहतूक पोलिसांनी तब्बल 27.68 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी हा दंड ठोठावला आहे. 

porsche 911 car fine 27 lakh rupees ahmedabad police traffic rules violation crime gujarat news marathi google
वाहतूक पोलिसांनी कार चालकाला ठोठावला 27.68 लाखांचा दंड (फोटो सौजन्य: @AhmedabadPolice)  |  फोटो सौजन्य: Twitter

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे एका आलिशान आणि महागड्या अशा पोर्शे 911 या स्पोर्ट्स कारच्या मालकाला वाहतूक पोलिसांनी चांगलाच दंड ठोठावला आहे. या कार मालकाला आपली कार वाहतूक पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तब्बल 27.68 लाख रुपयांचा दंड भलावा लागला आहे. या कारचे कागदपत्रे, नंबर प्लेट नसल्याने अहमदाबाद पोलिसांनी गाडी जप्त केली होती. त्यानंतर कार मालकाने टॅक्स, दंड आणि व्याजाची रक्कम भरुन गाडी सोडवली आहे.

मंगळवारी अहमदाबाद आरटीओमध्ये कार मालक रणजीत देसाई यांनी दंडाची रक्कम भरली आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली गाडी देसाई यांना परत केली. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात वाहतूक पोलिसांनी ही गाडी जप्त केली होती. या गाडीचा फोटो आणि दंड भरल्याची आरटीओची पावती वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्वीटर हँडलवर ट्वीट केली आहे.

बुधवारी अहमदाबाद पोलिसांनी ट्वीट केलं की, "आरटीओने एक पोर्शे कार मालकाला 27.68 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या गाडीचे कागदपत्र नसल्याने गाडी जप्त केली होती. देशातील सर्वाधिक दंडाची ही रक्कम आहे".

28 नोव्हेंबर रोजी गाडीची नंबर प्लेट नसल्याने वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली होती. त्यानंतर चौकशी केली असता गाडीचे कागदपत्रेही नव्हते. पोलिसांनी सांगितले की, गाडीची नंबर प्लेट नसल्याने आणि कागदपत्रे सुद्धा नसल्याने आम्ही गाडी जप्त केली. त्यानंतर मोटर वाहन कायद्यानुसार, कार मालकाला दंड ठोठावला. यानंतर आता कार चालकाने दंडाची रक्कम भरली असून गाडी सोडवली.

यापूर्वी या पोर्शे 911 कार मालकावर वाहतूक पोलिसांनी 9.8 लाख रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी ठोठावला होता. मात्र, नंतर आरटीओने जुने रेकॉर्ड्स तपासले असता दंडाच्या रकमेत वाढ झाली आणि ही रक्कम 27.68 लाख रुपये इतकी झाली. दंडाची ही रक्कम देशातील सर्वाधिक रक्कम आहे असंही वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी