PUBG मुळे कोल्हापुरातील तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, डॉक्टरांनी मोबाइल काढून घेताच प्रचंड आरडाआरोडा

Pubg Game: पबजी गेम हा आता दिवसेंदिवस अतिशय घातक होत चालला असल्याचं दिसून येत आहे. कारण पबजीमुळे कोल्हापूरमधील एका मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे.

PUBG_news_twitter
PUBG मुळे कोल्हापुरातील तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सतत पबजी गेम खेळल्याने कॉलेजवयीन तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं
  • मानसिक संतुलन बिघडल्याने तरुणाला रुग्णालयात करावं लागलं दाखल
  • पबजी गेम तरुणाईला घातक असल्याचं अनेकांचं मत

कोल्हापूर: पबजी (PUBG) या गेमचं तरुणाईला अक्षरश: वेड लागलं आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून या खेळावर भारतात बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे. पण अद्याप तरी तशी बंदी आलेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरु असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेमपासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. एवढंच नव्हे तर अनेक जण हे या गेमच्या आहारी गेले आहेत. यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे कोल्हापुरातील एका कॉलेजवयीन मुलाची मानसिक स्थिती ढासळली असल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. 

सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे कोल्हापूरमधील एक २० वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती ढासळल्याने त्याला चक्क रुग्णालयात दाखल करावं लागलं. कोल्हापूरमधील या तरुणाला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासळल्याचं दिसून आलं होतं. याच उपचारादरम्यानचा त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमधील पन्हाळा येथील एक २० वर्षीय तरुण पबजी गेममुळे आपलं मानसिक संतुलन बिघडवून बसला आहे. हा कॉलेजवयीन तरुण मागील काही दिवसांपासून सतत पबजी गेम खेळत असयाचा. गेल्या दोन-चार दिवसांपासून तर त्याने घरातील एका खोलीत स्वत:ला अक्षरश: कोंडून घेतलं होतं. त्याआधी गेम खेळण्याच्या नादात तो घरातील फार कुणाशी बोलायचा देखील नाही. पण काल (शनिवार) संध्याकाळच्या दरम्यान तो अचानक प्रचंड आरडाओरडा करु लागला. तो ज्या पद्धतीने विचित्र वागत होता ते पाहून त्याच्या घरातील लोकांना प्रचंड भीती वाटली आणि त्यांनी त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. 

डॉक्टरांनी देखील त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. त्याचवेळी डॉक्टरांनी त्याच्याकडून मोबाइल काढून घेतला. आपला मोबाइल काढून घेतल्याचं लक्षात येताच तरुणाने रुग्णालयात प्रचंड आराडओरडा सुरु केला. यावेळी तरुण काहीसा हिंसक झाल्याचं दिसत होता. डॉक्टरांनी काही प्राथमिक उपचार केल्यानंतर तरुण आपल्या घरी निघून गेला. पण घरी गेल्यावर पुन्हा तो विचित्र वागू लागल्याचं त्याच्या घरच्यांनी सांगितलं. यामुळे तरुणाच्या आई-वडिलांना आता आपल्या मुलाबाबत प्रचंड काळजी लागून राहिली आहे. त्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताचीच आहे. फक्त शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबातील तरुण मुलाची अशी परिस्थिती झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. याबाबतचं वृत्त न्यूज १८ लोकमत या चॅनलनं दिलं आहे. 

दुसरीकडे, याबाबत सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी अशी माहिती दिली की, सतत मोबाइल गेम खेळत असल्याने त्याचा थेट परिणाम या तरुणावर झाला आहे. त्यामुळे या तरुणावर वेळीच आणि ते देखील योग्य उपचार केले जाणे गरजेचं असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, चारच दिवसांपूर्वी बंगळुरुमध्ये पबजी गेम खेळण्यास वडिलांनी मनाई केल्याने त्यांच्या २५ वर्षीय मुलाने त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. तरुण दिवस-रात्र पबजी गेम खेळत असल्याने त्याचे वडील त्याला नेहमी रागवत असायचे. याच रागातून तरुणाने थेट आपल्या वडिलांचीच हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटकही केलं आहे. त्यामुळे पबजी हा गेम दिवसेंदिवस अतिशय घातक होत चालल्याचं दिसून येत आहे. अशावेळी आता याबाबत अतिशय ठोस असा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी