ट्रेनमध्ये आढळली बेवारस बॅग; उघडून पाहिली असता त्यात होती... 

रेल्वे प्रवास करताना ट्रेनमध्ये एक लाल रंगाची मोठी बॅग आढळून आली. ही बॅग कुणाची आहे हे कळलं नाही त्यामुळे बॅग उघडून पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Red bag
प्रातिनिधीक फोटो 

कानपूर : एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना त्यात एक मोठी बॅग बेवारस आढळून आली. उत्तरप्रदेशातील कानपूर रेल्वे स्थानकात स्वतंत्रता संग्राम सेनानी कोविड स्पेशल ट्रेनमध्ये ही बेवारस बॅग आढळून आली. ही बॅग उघडून पाहिली असता ती पूर्णपणे नोटांच्या बंडल्सने भरलेली आढळून आली आणि पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटले.

स्वतंत्रता संग्राम सेनानी कोविड स्पेशल ट्रेनमध्ये बेवारस बॅग ही पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम दिसून आली. त्यानंतर त्यांनी याची माहिती स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. ट्रेनमध्ये लाल रंगाची ट्रॉली बॅग बेवारस पडून असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाताच सर्वचजण सतर्क झाले. 

या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. घटनास्थळी तात्काळ रेल्वे पोलीस कर्मचारी, आरपीएफ कर्मचारी आणि रेल्वे अधिकारी दाखल झाले. यानंतर ट्रेनमध्ये या बेवारास बॅगचे स्कॅनिंग करण्यात आले. मग जीआरपीने ही बेवारस बॅग आपल्या ताब्यात घेतली. बॅग आपल्या ताब्यात घेतल्यानंतर ही एक्सप्रेस ट्रेन जयनगरसाठी रवाना करण्यात आली. 

बॅगमध्ये होती १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड

रेल्वे प्रशासनाने ही बॅग जीआरपीकडे सोपवली आणि या संदर्भातील सविस्तर माहिती आयकर विभागालाही देण्यात आली. जीआरपी आणि आरपीएफ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, नोटांची मोजणी सुरू करण्यात आली असता त्यात एक कोटी ४० लाख रुपये असल्याचं समोर आलं. या बॅगमध्ये २ हजार रुपये, ५०० रुपयांच्या सर्व नोटा होत्या.

इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड एका बेवारस बॅगेत आढळून आल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. जीआरपीच्या माहितीनुसार, ट्रेनमधील सर्व सीट्स आरक्षित होत्या आणि यासोबतच जनरल क्लासमधील प्रवाशांचीही सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी