मुसळधार पावसात सुरू होतं रस्त्याचे डांबरीकरण, VIDEO VIRAL होताच पीडब्ल्यूडीचे ४ अधिकारी निलंबित

Road construction in rain: मुसळधार पावसात रस्त्याचं डांबरीकरण सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

road construction in heavy rainfall 4 officer of pwd suspended in punjab after video goes viral
मुसळधार पावसात सुरू होतं रस्त्याचे डांबरीकरण, VIDEO VIRAL होताच पीडब्ल्यूडीचे ४ अधिकारी निलंबित  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • मुसळधार पावसात प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदारांचा कारनामा 
  • मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्याचं डांबरीकरण, व्हिडिओ व्हायरल होताच चार अधिकारी निलंबित

नवी दिल्ली : मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्याचं डांबरीकरण सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या जोरात पाऊस सुरू असताना रस्त्याचं डांबरीकरण कसं सुरू आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला. अखेर या व्हायरल व्हिडिओची प्रशासनाने दखल घेतली आणि कारवाई केली आहे. या रस्ते निर्मिती प्रकरणात पीडब्ल्यूडीच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

न्यूज एजन्सी एएनआयने याचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. होशियारपूर जिल्ह्यातील शेरपूर डाको गावात मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं. अशा प्रकारे रस्ते निर्मिती करुन सरकारी अधिकारी जनतेचा पैसा बरबाद करत असल्याची भावना नागरिकामधून येऊ लागली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मुसळधार पाऊस सुरू असतानाच काही मजूर हे रस्त्याचं डांबरीकरण करत आहेत.

रस्त्याचं डांबरीकरण सुरू असतानाच मुसळधार पाऊस सुद्धा सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. रस्त्यावरही पाणी काही प्रमाणात दिसून येत आहे. मात्र, असे असतानाही हे डांबरीकरणाचं काम थांबवण्यात आलं नाही आणि रस्त्याची निर्मिती सुरूच ठेवण्यात आली. हा व्हिडिओ तेथील एका स्थानिक नागरिकाने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला.

हे पण वाचा : राज्यात पावसाचं थैमान; १ जूनपासून आतापर्यंत ७६ जणांचा बळी तर ४९१६ जणांचं स्थलांतर

पाहता पाहता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, संपूर्ण राज्यात पसरला आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या. हा व्हिडिओ पंजाबमधील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला आणि त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

पंजाब सरकारने या प्रकरणी चार अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. यामध्ये तरसेम सिंह, परवीन कुमार, विपन कुमार, जसबीर सिंह या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ स्थानिक गावातील एका ग्रामस्थाने आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. मुसळधार पावसात रस्ते निर्मिती होत असल्याला ग्रामस्थांचाही विरोध होता. त्यामुळेच या ग्रामस्थाने हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत सरकारी अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा दाखवून दिला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी