Honda Activa VIP Number Chandigarh । मुंबई : भारतातील लोकांना त्यांच्या वाहनासाठी फॅन्सी नंबर घेणे आवडते हे नवीन नाही. बीएमडब्ल्यू असो किंवा एसयूव्ही वाहने, प्रत्येकाला आपल्या वाहनावर एक अनोखी नंबर प्लेट लावायची असते. मात्र ही क्रेझ दुचाकीमध्ये क्वचितच पाहायला मिळते. तसेच स्कूटीबद्दल भाष्य करायचे झाले तर या गाडीसाठी लोक फॅन्सी नंबर प्लेटला फारसे महत्त्व देत नाहीत. सध्या एक भन्नाट प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या स्कूटीच्या नंबर प्लेटसाठी लाखो रुपये गुंतवले आहेत. (Rs 15 lakh paid for a Scooty worth Rs 71,000, The shocking reason came to the fore).
अधिक वाचा : मशीदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा लावण्यास बंदी
अलीकडेच चंदीगढमधील एका व्यक्तीने लिलावादरम्यान एका फॅन्सी नंबर प्लेटसाठी लाखो रुपयांची बोली लावून लोकांना आश्चर्यचकित केले. माध्यमांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने फॅन्सी नंबर CH01-CJ-0001 खरेदी करण्यासाठी तब्बल १५.४४ लाखांची बोली लावली. तुम्हालाही हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याने फक्त त्याच्या स्कूटी होंडा ॲक्टिव्हासाठी १५ लाखांपेक्षा जास्त बोली लावली. या व्यक्तीकडे ७१,००० किमतीची स्कूटी होती ज्यासाठी तो बोली लावत होता.
ब्रिज मोहन नावाच्या व्यक्तीने सांगितले की, 'मी नुकत्याच विकत घेतलेल्या माझ्या Activa साठी हा नंबर वापरणार आहे. जरी नंतर मी तो नंबर माझ्या कारसाठी वापरत असलो तरी. २०१२ मध्ये ०००१ क्रमांकासाठी सर्वकालीन उच्च बोली ₹२६.०५ लाख होती, जी S-क्लास मर्सिडीज-बेंझच्या मालकाने लावली होती.
चंदीगढ नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाने १४-१६ एप्रिल दरम्यान CH01-CJ या सीरिज मधील फॅन्सी क्रमांक आणि उर्वरित क्रमांकांसाठी लिलाव आयोजित केला होता. यादरम्यान नंबर प्लेटसाठी ३७८ नंबर पुढे आल्या. या सीरिजसाठी बोली लावणाऱ्यांनी एकूण दीड कोटी रुपये खर्च केले. CH01-CJ-0002 ही नंबर प्लेटची ५.४ लाख रुपयांची दुसरी सर्वात महाग खरेदी होती.