Influencer Earning: जागेपणी आराम, झोपेत कमाई! झोपेच्या भांडवलावर कमावतो महिन्याला 28 लाख

जॅकी बोहम. तो राहतो ऑस्ट्रेलियात. वेब डेव्हलपर हा त्याचा मूळ पेशा. त्याचे टिकटॉकवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो रोज रात्री 10 वाजता झोपायला जातो.

Influencer Earning
जागेपणी आराम, झोपेत कमाई!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • झोपल्या झोपल्या कमावतो लाखो रुपये
  • झोपमोड करण्यासाठी लोक देतात हजारो रुपये
  • वर्षाला होते कोट्यवधींची कमाई

Influencer Earning: सोशल मीडियाने (Social Media) लोकांना केवळ माहिती आणि मनोरंजनच नाही, तर कमाईच्या संधीदेखील (Opportunity) उपलब्ध करून दिल्या आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) बनून लोक आता लाखोंची कमाई करताना दिसत आहेत. त्यासाठी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट द्यावं लागतं. त्यासाठी कुणी डान्सचा व्हिडिओ बनवतं, कुणी अभिनयात आपलं कौशल्य दाखवतं, कुणी ट्रॅव्हल ब्लॉगर बनतं, तर कुणी रेसिपी करून आपला ‘खिसा’ भरण्याचा प्रयत्न करतं. मात्र या सर्वांपेक्षा भन्नाट कल्पना एका व्यक्तीने शोधून काढली आहे. ही व्यक्ती झोपल्या झोपल्याच लाखो रुपयांची कमाई करते. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे खरं आहे. आपण ज्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दल जाणून घेणार आहोत, तो केवळ त्याच्या झोपेच्या भांडवलावर लाखो रुपये कमावत आहे. वर्षाचा हिशेब केला,तर प्रत्येक वर्षी तो 3 कोटी रुपये कमावतो. 

लोकांना आवडते इन्फ्लुएन्सरची झोप

या इन्फ्लुएन्सरचं नाव आहे जॅकी बोहम. तो राहतो ऑस्ट्रेलियात. वेब डेव्हलपर हा त्याचा मूळ पेशा. त्याचे टिकटॉकवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो रोज रात्री 10 वाजता झोपायला जातो. झोपताना तो ऑनलाईन येतो आणि त्याचे फॉलोअर्स त्याला ऑनलाईन पाहू शकतात. आता या काळात जर एखाद्या चाहत्याला त्याला झोपेतून जागं करण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी त्याला पैसे भरावे लागतात. अशा प्रकारे जॅकी हा झोपल्या झोपल्याही कमाई करत राहतो. 

अधिक वाचा - Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

अशी काम करते जॅकीची सिस्टीम

जॅकीने तयार केलेल्या सिस्टिमनुसार 5 मिनिटांसाठी त्याच्या घरातील लाईट लागतात आणि तो झोपेतून जागा होतो. त्याला असं 5 मिनिटं जागं करण्यासाठी लोकांना 30 हजार रुपये मोजावे लागतात. 30 हजार रुपये भरताच जॅकीच्या खोलीतील NEON रंगाची लाईट 5 मिनिटांसाठी ऑन होते आणि त्याला जागं होणं भाग पडतं. 

अधिक वाचा - Murder of partner: 1400 किलोमीटर दूर नेऊन केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या, नंतरची कृती अधिकच भयंकर

पाच मिनिटांचे 30 हजार रुपये

जॅकीच्या या सिस्टिममध्ये पाच मिनिटांसाठी त्याला जागं करायचं असेल, तर लोकांना 30 हजार रुपये मोजावे लागतात. कोण कशाला असे पैसे भरून त्याला जागं करेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र अशा प्रकारे पैसे भरून त्याला जागं करण्यात अनेकांना रस असल्याचं दिसून आलं आहे. दररोज कुणी ना कुणी पैसे भरून त्याला जागं करत असतं. पैसे भरल्यानंतर आपोआप त्याच्या खोलीतील लाईट लागतात आणि तो जागा होतो. झोपलेल्याला जागं करण्याचा आनंद लोक अशा प्रकारे घेऊ शकतात, या मानवी स्वभावाचा अंदाज जॅकीला बरोबर आला आहे. त्याचाच उपयोग करत त्याने पैसे कमवायला सुरुवात केली आहे. पैसे साठवून आपल्याला एक अलिशान घर घेण्याची इच्छा असून मानसिक आरोग्याशी संबंधित काही संघटनांना मदत करण्याची इच्छा असल्याचंही त्याने सांगितलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी