सोहमचा एका पायावर उड्या मारण्याचा विश्वविक्रम

Soham Mukherjee World Record Of Hopping On One Leg दुबईत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या सोहम मुखर्जीने विक्रम करण्यासाठी एक अचाट प्रयोग केला. 

Soham Mukherjee World Record Of Hopping On One Leg
सोहम मुखर्जी 

थोडं पण कामाचं

  • सोहमचा एका पायावर उड्या मारण्याचा विश्वविक्रम
  • घरात राहून केला विश्वविक्रम
  • ताइक्वांडो प्रशिक्षणाचा फायदा झाला, सोहमने दिली माहिती

दुबई: विश्वविक्रम (World Record) करण्यासाठी कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. दुबईत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या सोहम मुखर्जीने (Soham Mukherjee) विक्रम करण्यासाठी एक अचाट प्रयोग केला. 

घरात राहून केला विश्वविक्रम

सोहमने एका पायावर उभं राहून उड्या मारायला सुरुवात केली. बेडरूमध्ये त्याने हा प्रयोग केला. आपण करत असलेल्या कृतीचे सोहमने दोन कॅमेऱ्यांद्वारे व्हिडीओ रेकॉरर्डिंग केले. हे रेकॉर्ड त्याने विश्वविक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक या संस्थेला पाठवून दिले. संस्थेने सोहमच्या कृतीची दखल घेत विश्वविक्रम झाल्याचे प्रशस्तीपत्रक त्याला पाठवले आहे. 

सोहमचा उड्या मारण्याचा विश्वविक्रम 

सोहम मुखर्जीने एका पायावर उभं राहून न थांबता ३० सेकंदांमध्ये सलग ११० उड्या मारल्या. यातील ९ उड्या चुकीच्या  मारल्यामुळे त्या मोजायच्या नाही असा निर्णय घेण्यात आला. मात्र एका पायावर उभं राहून न थांबता ३० सेकंदात १०१ उड्या मारत सोहमने विश्वविक्रम केला आहे, असे प्रशस्तीपत्रक 'गिनीज बुक'ने पाठवले आहे. 

सोहमने मोडला आधीचा विक्रम

सोहमच्या आधी एका पायावर उभं राहून न थांबता ९६ उड्या मारण्याचा विक्रम अस्तित्वात होता. हा विक्रम सोहमने मोडला. दिल्लीशी नातं सांगणाऱ्या सोहमने विक्रम करताना दोन कॅमेऱ्यांद्वारे व्यवस्थित रेकॉर्डिंग केले होते. यातील एक कॅमेरा संपूर्ण कृती स्लो मोशन स्वरुपात रेकॉर्ड करत होता तर दुसरा कॅमेरा सामान्य रेकॉर्डिंग करुन उडी मारण्याच्या कामगिरीची नोंद घेत होता. गिनीज बुक या संस्थेने दोन्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासल्यानंतरच विश्वविक्रमाची नोंद केली. 

ताइक्वांडो प्रशिक्षणाचा फायदा झाला, सोहमने दिली माहिती

सलग १३ वर्ष ताइक्वांडो प्रशिक्षण घेतल्यामुळेच एका पायावर उभं राहून ३० सेकंदात १०१ उड्या मारण्याचा विश्वविक्रम करणे शक्य झाले, असे सोहमने सांगितले. या विक्रमासाठी स्वतःचे वजन पूर्ण वेळ स्वतःच्या दोन पायांवर तोलून धरणे तसेच उड्या मारताना स्वतःचा तोल सांभाळणे आवश्यक होते. ही कामगिरी व्यवस्थित पार पाडता आली त्यामुळेच विश्वविक्रम करणे शक्य झाल्याचे सोहम म्हणाला. त्याने विश्वविक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. 

माणसाला जगण्याची प्रेरणा देणारे गिनीज बुक

माणसाला जगण्याची, स्वतःच्या शारीरिक क्षमता वाढवण्याची प्रेरणा गिनीज बुकच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून मिळत आहे. जगातले पहिले गिनीज बुक १९५१ मध्ये प्रकाशित झाले आणि १९५५ पासून हे पुस्तक जगभर इंग्रजी भाषेतही उपलब्ध होऊ लागले. आतापर्यंत गिनीज बुक जगातील १०० देशांमध्ये २३ प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे. दरवर्षी या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित होते. नव्या आवृत्तीत वर्षभरातल्या अनेक विक्रमांची नोंद असते. या व्यतिरिक्त अनेक टीव्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून जगभर गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात आलेल्या रंजक विक्रमांची माहिती दिली जाते. भारतात २०११ मध्ये 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड - अब इंडिया तोडेगा' हा टीव्ही कार्यक्रम सुरू होता. अल्पावधीत हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला होता. प्रिती झिंटा आणि शब्बीर अहलुवालिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. 

पूर्ण खात्री करुनच नोंदवला जातो विक्रम

गिनीज बुकच्या नियमानुसार नव्या विक्रमाची सखोल चौकशी करुन सत्यता तपासल्यानंतर नोंद केली जाते. यानंतर विक्रम करणारी व्यक्ती अथवा व्यक्तींचा समूह अथवा संस्था यांना विक्रमाची नोंद केल्याची माहिती तसेच प्रशस्त्रीपत्रक पाठवले जाते. नवे विक्रमवीर सोशल मीडियावर गिनीज बुकने पाठवलेले विश्वविक्रमाचे प्रशस्त्रीपत्रक व्हायरल करू शकतात. तसेच मीडियासमोर स्वतःचे प्रशस्तीपक सादर करू शकतात. सोहम मुखर्जीनेही विश्वविक्रम पूर्ण झाल्यावर त्याची माहिती स्वेच्छेने जाहीर केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी