नवी दिल्ली: उत्तरप्रदेशमधील गोरखपूरचे भाजप (BJP) खासदार रवी किशन (Mp Ravi Kishan) यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या दिसेल की, जेव्हा रवी किशन हे व्यासपीठावरील एका खुर्चीवर बसत होते तेव्हाच ते खुर्चीवरुन अचानक खाली पडले. त्यांचा हा व्हिडिओ केवळ काही सेकंदांसाठी आहे.
छठ पुजेच्या निमित्ताने भाजप खासदार रवी किशन यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी, त्यांना शाल श्रीफळ देऊन आदर सन्मान केला गेला. यानंतर, ते खुर्चीवर बसत असतानाच अचानक ते खालीच पडले. सुदैवाने या प्रकारामुळे रवी किशन यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
हा व्हिडिओ २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळचा असल्याचे समजते आहे. गोरखपूरच्या मोहाडीपूर हायडिल कॉलनीमधील छठ पुजेच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.
छठ पुजेवरुन राजकारण:
दरम्यान, छठ पुजेवरुन बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. देशभरात कोरोनाचं संकट असल्याने अनेक राज्यांनी छठ पुजेच्या सार्वजनिक समारंभास बंदी घातली होती. तशीच बंदी दिल्ली सरकारने देखील घातली होती. त्यावरुन भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिका केली होती. दिल्लीत छठ पुजेवर बंदी घातल्यानंतर तिवारी यांनी केजरीवाल यांना थेट 'नमकहरम' मुख्यमंत्री असं म्हटलं होतं.
भाजप नेते मनोज तिवारी यांच्या 'ऑफिस ऑफ मनोज तिवारी'वरुन करण्यात आलेलं वादग्रस्त ट्वीट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिट्विट देखील केलं होतं.
याविषयी ते असंही म्हणाले होते की 'कुणी केजरीवाल यांना सांगा की छठ पूजा छतावर नव्हे तर नदी व तलावाच्या काठावर केलं जातं.' तिवारी पुढे असंही म्हणाले की, दिल्लीत साप्ताहिक बाजारपेठा चालू आहेत, राजधानीमध्ये २४ तास रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची परवानगी आहे. याने कोरोना पसरत नाही का?'
तिवारी याबाबत असंही म्हणाले की, 'दिवाळीच्या दिवशी केजरीवाल आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह लक्ष्मीपूजन कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्याचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले. या कार्यक्रमावर देखील कोरोनाचे संकटदेखील होते. केजरीवाल सरकारने छठ पूजासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करायला हवी होती. छठ पूजामध्ये एक व्यक्ती व्रत करतं आणि त्याच्याबरोबर फक्त दोन ते तीन लोक असतात. छठसाठी १० जणांनाही परवानगी दिली जाऊ शकते, परंतु त्यांनी बंदी घालून पूर्वांचल आणि बिहारमधील लाखो भाऊ-बहिणींच्या आस्थेला ठेच पोहचवली आहे.'