Viral Video of ATVM Operator who issued four train tickets in ten seconds : रेल्वेचे एटीव्हीएम (Automatic Ticket Vending Machine - ATVM) ऑपरेटर अंबाझगन यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कर्मचाऱ्याने दहा सेकंदात रेल्वेची चार तिकिटे काढून दाखविण्याची कमाल केली आहे. वेगाने एटीव्हीएम हाताळणाऱ्या अंबाझगन यांच्यामुळे तिकिटासाठी प्रवाशांना जास्त वेळ थांबावे लागत नाही. यामुळे चेन्नई एग्मोर रेल्वे स्टेशनवर लोकलचे तिकीट काढण्यासाठी येणारे प्रवासी निवांत दिसतात. त्यांना तिकिटासाठी रांगेत किती वेळ थांबावे लागेल याची चिंता नसते. । व्हायरल झालं जी
रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम हाताळण्यासाठी रेल्वे कर्मचारी अथवा रेल्वे सेवेतून निवृत्त झालेले पण अद्याप काम करण्याची इच्छा असलेले कर्मचारी अशांची नियुक्ती केली आहे. यापैकीच एक आहेत अंबाझगन (Anbazhagan) नावाचे निवृत्त रेल्वे कर्मचारी. या ६७ वर्षांच्या कर्मचाऱ्याकडे एटीव्हीएम हाताळण्याची जबाबदारी आहे.
रेल्वेत ३३ वर्ष काम करून निवृत्त झालेले अंबाझगन २०१५ पासून दर आठवड्यातील सहा दिवस एटीव्हीएम हाताळतात. एटीव्हीएम हाताळण्याची त्यांना एवढी सवय झाली आहे की ते वेगाने तिकीटे काढून देऊ लागले आहेत. या गतीमुळे प्रवाशांमध्ये अंबाझगन कौतुकाचा विषय झाले आहेत. वेगाने तिकीट काढून देण्याच्या कौशल्यामुळे अंबाझगन दररोज किमान एक हजार तिकिटांची विक्री करतात.
ड्युटीच्या काळात उभे राहून वेगाने काम करणे अंबाझगन यांना आवडते. एटीव्हीएम त्यांना एवढे सवयीचे झाले आहे की कोणीही कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी तिकीट मागितले तरी त्यांचा गोंधळ होत नाही. ते झटपट तिकीट काढून देतात. आपण तिकीट काढून देत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे हे त्यांना निवडक मीडिया प्रतिनिधींनी सांगेपर्यंत माहिती पण नव्हते.
रेल्वे प्रशासनाने अंबाझगन यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेतली आहे. डीआरएम चेन्नई कार्यालयाने अंबाझगन यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला आहे.