जग्वार हवी होती म्हणून, वडिलांनी दिलेली बीएमडब्ल्यू नदीत सोडली!

व्हायरल झालं जी
Updated Aug 12, 2019 | 17:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका बड्या बापाच्या बिघडलेल्या पोरानं आपल्याला हवी ती कार न दिल्यानं लाखो रुपयांची बीएमडब्लू कार नदीत फेकून दिली. चौकशीनंतर कार मालकाच्या मुलानेच हट्टापायी नदीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला.

haryana bmw car in river
जग्वार हवी होती म्हणून, बीएमडब्लू नदीत सोडली!  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • हरियाणातील बड्या बापाच्या मुलाचा धक्कादायक कारनामा; BMW नदीत ढकलून दिली
  • तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची नातेवाईकांची पोलिसांना माहिती
  • वडिलांनी जग्वार दिली नाही म्हणून मुलाने BMW नदीत ढकलून दिली

नवी दिल्ली : गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. पुराच्या पाण्यात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. प्रापंचिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांची वाहने, गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. त्याच वेळी हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बड्या बापाच्या बिघडलेल्या पोरानं आपल्याला हवी ती कार न दिल्यानं लाखो रुपयांची बीएमडब्लू कार नदीत फेकून दिली. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे वाटत होते. पण, चौकशीनंतर कार मालकाच्या मुलानेच हट्टापायी आपली कार नदीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. बड्या बापांची बिघडलेली पोरं कोणत्या थराला जाऊ शकतात हेच घटनेवरून दिसून येते. सध्या या घटनेची हरियाणा आणि दिल्ली परिसरात सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे.

पोलिसांना वाटला अपघात

हरियाणातील यमुनानगर परिसरात शुक्रवारी दुपारी एक कार वाहत येताना दिसत होती. अपघाताची शक्यता वाटू लागल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने कार नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर एका क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात यश आल्यानंतर कारमध्ये कोणीच नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. कारच्या क्रमांकावरून मिळालेल्या माहितीनुसार कार, यमुनानगरमधील मुकारमूरचा रहिवासी असलेल्या आकाशची असल्याचे समजले. त्यानंतर ही कार वाहत येण्यामागचे कारण समजल्यानंतर पोलिसांनाही मोठा धक्का बसला. आकाशच्या वडिलांनी गेल्याच महिन्यात ४५ लाख रुपयांना ही कार आकाशला घेऊन दिली होती. पण, आकाशला BMW कार नको होती. त्याला जग्वार कार हवी होती. त्यामुळे तो नाराज होता. त्यामुळे त्याने BMW  कार विकून ८० लाख रुपयांची जग्वार खरेदी करण्याचा विचार करत होता. पण, घरच्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे आकाश नाराज होता. घरच्यांना विनंती करूनही त्यांनी जग्वार घेऊन देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या आकाशने BMW  कार नदीत फेकून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो घरातून BMW कारसह बाहेर पडला एका पुलावर पोहोचल्यानंतर तो कारमधून उतरला आणि त्याने रिमोटच्या साह्याने कार चालवत ती थेट नदीत पाडली. ४५ लाख रुपयांची कार नदीत बुडत होती आणि आकाश पुलावरून ते पाहत होता. केवळ त्याने कार बुडताना पाहिली नाही तर, त्याने कार नदीत पडून वाहून जातानाचा व्हिडिओही शूट केला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ आपल्या कुटुंबीयांना देखील सेंड केला होता.

पोलिसांकडून चौकशी सुरू

मिळालेल्या माहितीनुसार आकाशला महागड्या गाड्यांची हौस आहे. त्याने यापूर्वी फॉर्च्युनर खरेदी केली होती. त्यानंतर त्याने BMW कार खरेदी केली. पण, त्याला ती कार छोटी वाटत होती. त्यामुळे त्यानं घरच्यांकडे जग्वारसाठी हट्ट धरला होता. आकाशचे वडील जमीनदार असून, त्यांचा मोठा व्यवसाय असल्याचीही माहिती आहे. या संदर्भात डीएसपी देशराज यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आकाशच्या नातेवाईकांनी तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं सांगितलंय. त्यानं नियमांचं उल्लंघन केलेलं नाही ना, याची आम्ही चौकशी करत आहोत. सध्या आकाशला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
जग्वार हवी होती म्हणून, वडिलांनी दिलेली बीएमडब्ल्यू नदीत सोडली! Description: एका बड्या बापाच्या बिघडलेल्या पोरानं आपल्याला हवी ती कार न दिल्यानं लाखो रुपयांची बीएमडब्लू कार नदीत फेकून दिली. चौकशीनंतर कार मालकाच्या मुलानेच हट्टापायी नदीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...