चर्चगेटमधून नदीचा उगम, व्हिडीओ झाला व्हायरल

waterlogging in mumbai near churchgate station मुंबईत पावसाला सुरुवात झाली आणि चर्चगेटमध्ये उगम पावलेल्या छोटेखानी नदीचा व्हिडीओ व्हायरल झाला.

waterlogging in mumbai near churchgate station
चर्चगेटमधून नदीचा उगम, व्हिडीओ झाला व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • चर्चगेटमधून नदीचा उगम, व्हिडीओ झाला व्हायरल
  • पाणी साचण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात
  • चर्चगेटमधील 'त्या' नदीपासून मुंबई मनपाचे मुख्यालय चालत १० मिनिटांवर

मुंबईः महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची (mumbai) ख्याती. एरवी गजबजलेलं हे शहर कोरोना संकटामुळे मागील अनेक दिवसांपासून तुलनेनं शांत आहे. पण पावसाळा (rain) सुरू होताच मुंबईची चर्चा नव्या निमित्ताने सुरू झाली. 

हवामान विभागाचा मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट

यंदा निमित्त ठरले दक्षिण मुंबईतला चर्चगेट (Churchgate) परिसर. हो. या चर्चगेटमधून चक्क नदीचा उगम झाल्यासारखं मुंबईकरांना वाटत आहे. हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला. सलग दोन दिवस मुंबईत पाऊस पडणार, असे सांगितले. हा अलर्ट येताच अनुभवी मुंबईकर आता मध्य मुंबईत पाणी साचल्याच्या (Waterlogging) बातम्या बघायच्या अशी मनाची तयारी करत होता. पण यंदा परंपरागत बातमी सोबत चर्चगेटची बातमी आली. चर्चगेटमध्ये स्टेशन समोर इरॉस सिनेमा थिएटरची इमारत आहे. स्टेशन आणि इरॉस यांच्या दरम्यानच्या रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. एखाद्या छोट्या नदीचे पात्र वाटावे एवढे पाणी वाहू लागले. अनेक मुंबईकरांनी या घटनेचा व्हिडीओ तयार केला आहे. यातलाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाणी साचण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात

ज्या भागात पावसामुळे छोटेखानी नदी वाहू लागली त्याच भागात मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरू आहे. आता मुंबई मनपाने (Municipal Corporation of Greater Mumbai) मेट्रो प्रशासनावर आणि मेट्रो प्रशासनाने मुंबई मनपावर (mcgm) जबाबदारी ढकलायला सुरुवात केली आहे. 

पावसाळी कामांची जबाबदारी मुंबई मनपाची

नियमानुसार पावसाळ्याआधी मुंबईत पाणी साचू नये आणि साचले तर त्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी आहे मुंबई मनपाची. मुंबई मनपाचे आयुक्त आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अखत्यारित कार्यरत असतात. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, मुंबई शहरचे पालकमंत्रीपद ही दोन्ही शिवसेनेच्या (shivsena) ताब्यात आहेत. मुंबई मनपावर तर २ दशकांपेक्षा जास्त वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. अशा परिस्थितीत वेगवेगळे सरकारी विभाग उत्तम समन्वय राखून काम करतील, मुंबईत पावसाळ्याशी संबंधित कामं व्यवस्थित होतील; अशी आशा मुंबईकरांना वाटत होती.  पण 'ऑरेंज' अलर्ट आला, पावसाला सुरुवात झाली आणि मुंबईकरांची आशा पाण्यासोबत वाहून गेली. आठवण म्हणून छोटेखानी नदीचा व्हिडीओ व्हायरल करुन गेली. 

चर्चगेटमधील 'त्या' नदीपासून मुंबई मनपाचे मुख्यालय चालत १० मिनिटांवर

ज्या भागातून छोटेखानी नदी वाहत होती त्या भागापासून चालत १० मिनिटांत मुंबई मनपाच्या मुख्यालयात पोहोचता येते. मनपाचा मुख्य पावसाळी नियंत्रण कक्ष आणि कोरोना रुग्णांसाठीचा नियंत्रण कक्ष याच मुख्यालयात आहे. या नियंत्रण कक्षाकडून आवश्यक ते उपाय होतील आणि पाणी साचण्याची पुनरावृत्ती होणार नाही, अशी आशा स्थानिक बाळगून आहेत. 

धोक्याचा इशारा

  1. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ ते ४८ तास मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपगनरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  2. ५ जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
  3. ६ जुलै: कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी