प. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचा विजय, भाजप सत्तेपासून दूर, विरोधक खूष

व्हायरल झालं जी
Updated May 02, 2021 | 20:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपला ८० जागांच्या जवळपास जागा जिंकता आल्याने भाजप सत्तेपासून दूर गेला आहे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १९५७ मतांनी पराभव केला आहे.

Mamata Banerji defeats BJP
प. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचा विजय 

थोडं पण कामाचं

  • ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
  • तृणमूलचा दणदणीत विजय, भाजप सत्तेपासून दूर
  • नंदीग्राममध्ये मात्र ममतांचा पराभव

नवी दिल्ली : प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. भाजपला सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे. ममता बॅनर्जी वैयक्तिकरित्या नंदीग्राममधून निवडणूक हरल्या असल्या तरी विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा जिंकत टीएमसी पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपला ८० जागांच्या जवळपास जागा जिंकता आल्याने भाजप सत्तेपासून दूर गेला आहे. 

ममतांवर शुभेच्छांचा वर्षाव


प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावर ममता बॅनर्जींना अनेक राजकीय नेत्यांनी शभेच्छा दिल्या आहेत. ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा प. बंगालच्या मुख्यमंत्री होणार आहेत. प. बंगालमधील ममतांच्या विजयाला गालबोट लागले आहे, नंदीग्राममधील त्यांच्या पराभवाचे. नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा १९५७ मतांनी पराभव केला आहे. नंदीग्रामच्या या लढतीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. काही फेऱ्यांमध्ये सुवेंदू अधिकारी पुढे होते तर काही फेऱ्यांमध्ये ममतांनी आघाडी घेतली असल्याच्या बातम्या येत होत्या. शेवटच्या क्षणापर्यत या लढतीची चुरस कायम होती.

ममतांच्या विजयावर विरोधक खूष


प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचा विजय झाल्यानंतर आणि भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजपच्या विरोधक राजकीय पक्षांनीदेखील आनंदाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी या एकहाती विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

संजय राऊतांची प्रतिक्रिया


शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील ममतांचे अभिनंदन केले आहे. 'ममता बॅनर्जी या बंगालच्या वाघीण आहेत. निवडणुकीचा प्रचार करताना त्या जखमी झाल्या होत्या, व्हिलचेअरवर फिरत होत्या. मात्र तरीही त्यांनी एकहाती बंगालच्या निवडणुकीत विजय मिळवला. या विजयाने देशाच्या राजकारणाला नवे वळण मिळेल. तृणमूलच्या बंगालमधील विजयाच्या यशाची मशाल देशभर प्रकाश पाडेल. ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी कोरोनाच्या संकटातसुद्धा सरकारी यंत्रणेचा वापर करण्यात आला. केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून बसले होते. मात्र तरीही भाजपचा पराभव झाला. बंगालच्या निवडणुकीनंतर देशाचा कोरोनाच्या संसर्गाची जी स्थिती झाली त्यावर चेन्नई उच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले,' या शब्दात प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी केले अभिनंदन


तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या आणि प. बंगालमधील विजयाच्या शिल्पकार ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. 'त्यांनी प. बंगालमधील विजय एकहाती घेचून आणला. बंगालच्या स्वाभिमानाची लढाई एकहाती लढत ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला. या विजयाचे सर्व श्रेय या बंगालच्या वाघिणीलाच जाते. पंतप्रधान, गृहमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांमधील मंत्री यांनी ममता यांचा पराभव करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र या सर्व शक्तींचा ममता यांनी पराभव केला. मी त्यांचे आणि बंगालच्या जनतेचे अभिनंदन करतो,' असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शरद पवारांनी ट्विट करत केले अभिनंदन


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील ममता बॅनर्जींचे अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. 'ममता बॅनर्जींचे दणदणीत विजयासाठी अभिनंदन. लोकांच्या हितासाठी आणि कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी एकत्र काम करूया,' अशा शब्दात शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.


अमित शाहांची प्रतिक्रिया


'बंगालच्या जनतेचा आम्ही सन्मान करतो. भाजपला दिलेल्या समर्थनासाठी जनतेचे आभार व्यक्त करतो. भाजप एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून बंगालच्या जनतेच्या अधिकारांसाठी आणि राज्याच्या विकासासाठी सतत आवाज उठवत राहील. भाजपच्या बंगालमधील कार्यकर्त्यांचे त्यांचे परिश्रमासाठी अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.

अमित मालविय यांचा सवाल


तर भाजपच्या पराभवानंतर त्यांच्याही महत्त्वाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'प. बंगालच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयावर हल्ला केला असून ते जाळले आहे. बंगालला पुढील ५ वर्षे हेच सहन करायचे आहे का?' असे अमित मालविय यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कार्यालय जळत असताना व्हिडिओदेखील टाकला आहे.

विजय वर्गीय यांचे मत


भाजपचे बंगालमधील कर्ताधर्ता विजय वर्गीय यांना गृहमंत्री अमित शाह यांनी बंगालमधील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीसंदर्भात फोन केला होता. 'टीएमसीचा विजय फक्त ममता बॅनर्जींमुळे झाला आहे. असे दिसते की बंगालच्या जनतेने ममता दीदींना निवडले आहे. या पराभवाचा आम्ही अंतर्मुख होऊन विचार करू. नक्की काय चुकले, पक्ष संघटनेतील मुद्दे, बंगालमध्ये भाजपला चेहरा नसणे, राज्यातील विरुद्ध राज्याबाहेरील वाद यासारख्या मुद्द्यांवर आम्ही विचार करू. नक्की काय चुकले याचा आम्ही विचार करू,' असे मत विजय वर्गीय यांनी व्यक्त केले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी