गोरखपूर: उत्तरप्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. गोरखपूर येथील कैंपियरगंज परिसरात एका महिलेला तिचा पती दररोज अंड खाण्यासाठी देत नसल्याने पत्नी थेट आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. खरं तर याच गोष्टीवरुन महिलेचं नेहमी आपल्या पतीसोबत भांडण व्हायचं. तिला दररोज अंड खाण्यासाठी हवं असताना तिचा पती मात्र त्या गोष्टीला विरोध करायचा. याच गोष्टीवरुन त्यांच्यात वाद निर्माण व्हायचा. या महिलेचं लग्न हे साधारण चार वर्षापूर्वी झालं होतं. तिचा पती हा एक कामगार होता.
ही महिला चार महिने आधी देखील आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. पण त्यावेळी ती परत आल्यानंतर तिने आपल्या जबाबात पोलिसांना असं सांगितलं होतं की, तिचा पती तिला दररोज अंड खाण्यास देत नाही. दरम्यान, शनिवारी पुन्हा एकदा महिला आणि तिच्या पतीमध्ये याच गोष्टीवरुन जोरदार भांडण झालं. त्यानंतर ती पुन्हा घरातून कुठे तरी निघून गेली. दुसरीकडे तिचा प्रियकर देखील त्याच्या घरात नाहीए. त्यामुळे तिच्या पतीला असा संशय आहे की, ती पुन्हा एकदा आपल्या प्रियकरासोबतच पळून गेली असण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेच्या घराजवळच राहणाऱ्या एका तरुणाला समजलं की, महिलेला अंड खूपच आवडतं तेव्हा त्याला जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा-तेव्हा तो महिलेसाठी अंड घेऊन थेट तिच्या घरी जायचा. तो नेहमी-नेहमी असं करत असल्याने महिला थेट तरुणाच्या प्रेमातच पडली. दरम्यान, दुसरीकडे महिलेच्या पतीने असं म्हटलं की, रोजंदारीवर काम करत असल्याने तो दररोज आपल्या कुटुंबासाठी अंडी खरेदी करु शकत नव्हता. यावेळी त्याने असाही आरोप केला आहे की, त्याच्या याच कमजोरीचा फायदा त्याच्या बायकोच्या प्रियकराने उचलला.
दरम्यान, याप्रकरणात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली असून पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. पण अद्याप तरीही त्या दोघांचाही थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही.