Inspiring Woman : लेकरांना कडेवर घेऊन करते फूड डिलिव्हरी, सोशल मीडियावर झाला Video Viral

आपल्या मुलाला कडेवर घेऊन फूड डिलिव्हरी करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Inspiring Woman
लेकरांना कडेवर घेऊन करते फूड डिलिव्हरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलाला कडेवर घेऊन फूड डिलिव्हरी
  • सतत असतं लहान मुल कडेवर
  • परिस्थितीपुढे न झुकता स्वाभिमानाचं आयुष्य

Inspiring Woman : सोशल मीडियावर (Social Media) कधी कुठली गोष्ट व्हायरल (Viral Video) होईल सांगता येत नाही. कधीकधी फारच किरकोळ गोष्टी व्हायरल होतात, तर काही गंभीर आणि विचार करायला लावणारे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. सध्या एका आईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही आई फूड डिलिव्हरी (Food Delivery Mother) करण्याचं काम करते. हल्ली फूड डिलिव्हरी करण्याचं काम वेगवेगळ्या वयोगटातील महिला आणि पुरुष करतच असतात. मात्र ही महिला त्यांच्यापेक्षा एका कारणासाठी वेगळी ठरते. इतर सगळे डिलिव्हरी पार्टनर हे आपापल्या वाहनावरून केवळ जो पदार्थ पोहोचवायचा आहे, त्याचं पाकिट घेऊन जात असतात. मात्र ही महिला त्याच्यासोबत आपल्या दोन मुलांनाही घेऊन फिरत असते. 

मुलांसोबत डिलिव्हरीचे काम

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत झोमॅटो कंपनीसाठी डिलिव्हरी करणारी एक महिला दिसते. या महिलेच्या कडेवर एक तान्हं बाळ आहे आणि तिच्यासोबत साधारण पाच-सहा वर्षांचा एक मुलगाही आहे. जिथं जिथं फूड डिलिव्हरी करण्यासाठी ही महिला जाईल, तिथं तिथं तिच्यासोबत ही मुलंही असतात. आपल्या लहान बाळाला सांभाळायला घरी दुसरं कुणीच नसल्यामुळे त्यांना सोबत घेऊन फिरण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नसल्याचं ही महिला सांगते. 

आव्हानात्मक काम

फूड डिलिव्हरीचं काम हे प्रचंड थकवणारं काम असतं. सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी करावा लागणारा प्रवास, हॉटेलच्या काउंटरवर फूड पॅकेटची वाट पाहत उभं राहणं, वेगवेगळे पत्ते शोधणं, त्या पत्त्यावर लवकरात लवकर फूड डिलिव्हरी करणं, वाटेत लागणारं ट्रॅफिक, पाऊस, खड्डे यासारखी अनेक आव्हानं पेलत रोजच्या रोज हे डिलिव्हरी पार्टनर गरमागरम अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्या गोंधळात आपल्या तान्हुल्या बाळालाही सांभाळायचं आणि सोबत असणाऱ्या त्याच्या मोठ्या भावाकडेही लक्ष द्यायचं, अशी दुहेरी जबाबदारी पेलत ही महिला आपलं काम पार पाडते आहे. 

अधिक वाचा - Use of Brain : पोलीस करत होते पाठलाग, त्याने चालवलं डोकं, पाहा VIDEO

ग्राहकाला वाटलं कौतुक

एका ग्राहकांकडे फूड डिलिव्हरी करण्यासाठी ही महिला जेव्हा पोहोचली, तेव्हा तिच्या कडेवर तान्हं बाळ पाहून त्याला आश्चर्य वाटतं. त्याने तिच्याकडे चौकशी केली असता त्याला तिची परिस्थिती समजली. त्याने तिचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. उन असो, थंडी असो किंवा पाऊस. कुठल्याही परिस्थितीत या मुलाला घेऊनच तिला सर्वत्र फिरावं लागतं. ती कष्ट करून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पैसे जमा करत आहे आणि स्वाभिमानाने आपलं आयुष्य जगत आहे. या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती म्हणत असल्याचं आपल्याला ऐकू येतं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा - Prank : मिशीवाल्या वधूला पाहून दचकला नवरदेव, पाहा VIDEO

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी