बनावट अँटीकरप्शन ब्यूरो अधिकाऱ्याची महिलेकडून चपलेनं धुलाई, व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 08, 2019 | 13:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

जमशेदपूरची एक जबरदस्त घटना पुढे आली आहे. इथं स्वत:ला अँटी करप्शन अधिकारी सांगणाऱ्या एका व्यक्तीला महिलेनं चपलेनं चांगलंच चोप दिलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय... पाहा हा व्हिडिओ....

Woman Thrashed Man
महिलेचा बनावट अधिकाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: ANI

जमशेदपूर: झारखंडच्या जमशेदपूर शहरात स्वत:ला अँटी करप्शन ब्युरोचा अधिकारी सांगणाऱ्या एका व्यक्तीची महिलेनं जबरदस्त धुलाई केली. या व्यक्तीनं महिलेकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. महिलेनं त्या खोट्या अधिकाऱ्याला अटक करविण्यासाठी पोलिसांना फोन केला. पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही घटना जमशेदपूरच्या मानगो भागातील आहे.

मानगो भागात पोलीस स्टेशन इंचार्ज अरुण मेहता यांनी सांगितलं की, त्या महिलेची तक्रार होती की एका व्यक्तीनं तिच्या कौटुंबिक समस्यांवर उपाय करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानं स्वत:ला आपण अँटी करप्शन ब्यूरोचे अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. त्याच्याजवळून तसं बनावट ओळखपत्रही जप्त करण्यात आलं आहे. 

बनावट अधिकारी बनून पैसे उकळणाऱ्या या व्यक्तीला महिलेनं चपलेनं चांगलंच चोपलं. या दरम्यान तिथं खूप गर्दी झाली होती. लोकांनी सुद्धा त्याला पकडून काठ्यांनी मारलं. यानंतर तिथं पोलीस आले आणि त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. आरोपी जवळून त्याची कार सुद्धा हस्तगत केली गेली आहे.

पोलिसांनी त्याच्याजवळून जप्त केलेल्या आयकार्डमधून अशाप्रकारचं कुणी खोट्या अधिकाऱ्यांचं रॅकेट तर चालवत नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव फणींद्र असल्याचं समजतं आहे, जो घाटशिलाच्या चाकुलियाचा रहिवासी आहे. त्यानं जमशेदपूरशिवाय इतरही काही जिल्ह्यांमध्ये लोकांना अशाच पद्धतीने लुटलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत अधिक तपास करत आहेत. कारण त्या व्यक्तीकडून एक नाही तर दोन-तीन बनावट आयकार्ड सापडले आहे. त्यातील एक आयकार्ड रेल्वे अधिकाऱ्याचंही होतं.

महिलेनं केलेल्या त्या खोट्या अधिकाऱ्याच्या धुलाईचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यूजर्स महिलेची स्तुती करताना दिसत आहेत. तर अनेक यूजर्स व्हिडिओतील खोटा अधिकारी कुणासारखा दिसतोय, यावर चर्चा करत आहेत.

दरम्यान, अशाप्रकारच्या घटना देशात आधीही घडल्या आहेत. अनेक लुटणारे लोकं अशाप्रकारचे खोटे कागदपत्र आणि आयकार्ड बनवून गंडा घालतात. कधी-कधी अशी प्रकरणं पुढे येतात तर कधी येत नाही. मात्र अशा लुटारू व्यक्तींपासून आपण सावध असलं पाहिजे, असा सल्ला पोलीस नेहमीच देताना दिसतात. अशा गंडा घालणाऱ्या लोकांपासून प्रत्येकानेच सावध राहिलं पाहिजे आणि असे लोक आपल्या दृष्टीस पडल्यास त्यांची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्थानकात द्या.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बनावट अँटीकरप्शन ब्यूरो अधिकाऱ्याची महिलेकडून चपलेनं धुलाई, व्हिडिओ व्हायरल Description: जमशेदपूरची एक जबरदस्त घटना पुढे आली आहे. इथं स्वत:ला अँटी करप्शन अधिकारी सांगणाऱ्या एका व्यक्तीला महिलेनं चपलेनं चांगलंच चोप दिलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय... पाहा हा व्हिडिओ....
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola