Necklace theft: गॉगल आणि मास्क लावलेल्या महिलेने सराईतपणे चोरला 10 लाखांचा हार, पाहा व्हिडिओ

ज्वेलरीच्या दुकानात नेकलेस पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेने कुणालाही कल्पना येऊ न देता दहा लाखांचा हार लंपास केला. दुकानदारासमोर ही घटना घडूनदेखील महिलेच्या हातचलाखीमुळे ती त्याच्या लक्षात आली नाही.

Necklace theft
गॉगल आणि मास्क लावलेल्या महिलेने सराईतपणे चोरला 10 लाखांचा हार  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • महिलेने सराईतपणे चोरला नेकलेस
  • कुणालाही आली नाही पुसटशी कल्पना
  • सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर समोर आले सत्य

Necklace theft: सोने चांदीच्या दुकानात (Jewellery Shop) चोरीच्या घटना अनेकदा घडतात. दुकानदारांच्या डोळ्यादेखत मात्र त्यांना कुठलीही कल्पना येऊ न देता सराईतपणे काहीजण चोरी करतात. कुठल्याही रूपात हे चोर येतात आणि हात साफ करून जातात. उत्तरप्रदेश मधील गोरखपुरमध्ये सध्या अशीच एक घटना घडली आहे. ज्वेलरीच्या दुकानात नेकलेस पाहण्यासाठी आलेल्या एका महिलेने कुणालाही कल्पना येऊ न देता दहा लाखांचा हार लंपास केला. दुकानदारासमोर ही घटना घडूनदेखील महिलेच्या हातचलाखीमुळे ती त्याच्या लक्षात आली नाही. मात्र जेव्हा या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा नेमका प्रकार काय घडला, हे स्पष्ट झाले.

महिलेने केली हातचलाखी

गोरखपूरमधील ज्वेलरी दुकानात नेहमीप्रमाणेच ग्राहकांची गर्दी होती. उच्चभ्रू वर्गातील वाटणारी एक महिला डोळ्यावर गॉगल आणि तोंडावर मास्क लावून दुकानात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपला चेहरा रेकॉर्ड होऊ नये, हाच त्यामागचा उद्देश असल्याचे आता स्पष्ट होत आहे. या महिलेने दुकानात आल्यानंतर महागडे नेकलेस पाहायला सुरुवात केली. एक महिला आणि एक पुरुष दुकानदार तिला नेकलेस दाखवत होता. वेगवेगळे नेकलेस पाहण्याच्या नादात एक नेकलेस तिने आपल्या पिशवीत टाकला. पण ही कृती तिने इतक्या सराईतपणे केली की तिथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही याचा संशय आला नाही. एका मागून एक नेकलेस पाहत असताना काही नेकलेस ती दुकानदार महिलेला तिच्या गळ्यापाशी पकडून कसे दिसतात, हे दाखवायलाही सांगत होती. या सगळ्या प्रकारादरम्यान महिला आणि पुरुष या दोन्ही दुकानदारांची नजर चुकवून महिलेने नेकलेस आपल्या पिशवीत घातला. त्यानंतरही काही वेळ नेकलेस पाहण्याचे नाटक केले आणि मग एकही नेकलेस आपल्याला आवडला नसल्याचे सांगत तिथून काढता पाय घेतला.

अधिक वाचा - Viral Video: बॉडी बिल्डर वधू-वर स्टेजवरच दाखवू लागले ताकद, व्हिडिओ होतोय व्हायरल

हिशोबावेळी गदारोळ

दुकान बंद करतेवेळी एक नेकलेस कमी असून त्याची किंमत दहा लाख रुपये असल्याचे समोर आले. इतक्या मोठ्या रकमेचा नेकलेस गायब झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. आपल्या स्टाफपैकीच कोणीतरी हा नेकलेस लांबवण्याचा संशय सुरुवातीला दुकानाच्या मालकाला आला. त्यासाठी दुकानात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची झडतीदेखील घेण्यात आली. मात्र कोणाकडेच हा नेकलेस न सापडल्यामुळे अखेर सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा निर्णय झाला.

अधिक वाचा - चोरी करायला गेला अन् दरवाजात अडकला, जागेवरच तडफडून मृत्यू

सीसीटीव्हीतून समोर आली सत्य

सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहिल्यानंतर डोळ्याला गॉगल लावून आलेल्या आणि तोंडावर मास्क असलेल्या महिलेनेच हा नेकलेस लांबवल्याचे स्पष्ट झाले. तिने ज्या सराईतपणे हा नेकलेस लांबवला त्याची कल्पना सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेजमधून देखील येत नव्हती. मात्र हे फुटेज बारकाईने तपासल्यानंतर महिलेने अत्यंत सफाईदारपणे हा नेकलेस चोरल्याचे स्पष्ट झाले. दुकानाच्या मालकाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलीस चोरट्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी