[VIDEO] लॉकडाऊन तोडत असलेल्या बाईकस्वाराला पोलिसानं रोखलं, तरुणानं पोलिसालाच रस्त्यावर फरफटलं

व्हायरल झालं जी
Updated Apr 09, 2020 | 20:37 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मुंबईतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. जिथं लॉकडाऊन तोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका बाईकस्वाराला पोलिसानं थांबवलं असता त्यानं पोलिसालाच रस्त्यावरून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. बघा हा धक्कादायक व्हिडिओ...

CCTV
दुचाकीसोबत पोलिसालाच ओढणाऱ्या बाईकस्वाराचा व्हिडिओ व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • देशातील जनतेच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काही लोकांचं काम सुरू
  • लॉकडाऊन दरम्यान बाईकवरून फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी हटकलं.
  • बाईक न थांबवताच तरुणांनी पोलिसालाच बाईक सोबत फरफटत नेलं, दोघंही जखमी

मुंबई: देशात कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. झपाट्यानं देशात कोरोना संक्रमित रुग्णांची आकडेवारी वाढतेय. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. एक हजारांहून अधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झालीय. त्यातील मुंबई शहर कोरोनाचं हॉटस्पॉट ठरतंय. अशावेळी कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी लढा देत असलेले पोलीस कर्मचारी आणि डॉक्टर नागरिकांसमोर एक मोठी संरक्षक भिंत म्हणून काम करत आहेत. एकीकडे डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे पोलीस दिवस रात्र रस्त्यांवर उभं राहून लॉकडाऊनचं काटेकोर पालन करवण्याचा प्रयत्न करत आहेत.

देशात लॉकडाऊनचं अनेक नागरिक काटेकोरपणे पालन करत आहेत. मात्र त्यात असे काही लोक आहेत, जे या सर्वांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचा प्रयत्न करत आहेत. असं वागून हे लोक स्वत: सोबत इतरांचा जीवही धोक्यात घालत आहेत. अशा लोकांमुळे पोलिसांना खूप त्रास सहन करावा लागतोय. नुकताच मुंबईतील असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. जिथं एक बाईकस्वाराला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाईकस्वार थांबला नाही उलट त्यानं पोलिसालाही सोबत फरफटत नेलं.

डोंगरी भागातील नाकेबंदी दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यानं बाईकस्वार तरुणांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा बाईकस्वार थांबले नाही तेव्हा पोलीस कर्मचारी बाईकला मागून पकडून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र बाईकस्वारनं गाडी थांबवली नाही आणि पोलीसही बाईकसोबत रस्त्यावरून फरफटत गेला. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं नसलेल्या या घटनेदरम्यान पोलीस कर्मचारी जखमी झालाय. तर बाईकस्वार तरुणांनाही मार बसलाय.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की एका दुचाकी वाहनाला मागून पोलीस कर्मचाऱ्यानं पकडलं आहे आणि बाईकस्वार गाडी थांबवत नाहीय. नंतर बाईकस्वारसोबत पोलीस कर्मचारी पण रस्त्यावर पडलेला दिसतोय.

अशाचप्रकारच्या घटना राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी घडतांना दिसून येत आहेत. कुठे अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना लोक घरातून बाहेर काढत आहेत. मारहाण करत आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊनचं पालन करत नसलेल्यांना अडवत असणाऱ्या पोलिसांवरही हल्ले होत आहेत. कुठे त्यांना शिवीगाळ तर कुठे मारहाण केली जातेय. अशा लोकांमुळे देशात कोरोनाचं संकट अधिक वाढू शकतंय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी