[VIDEO]: MRI मशीनमध्ये रुग्णाला ठेवल्याचंच टेक्निशियन विसरले आणि मग...

व्हायरल झालं जी
Updated Sep 23, 2019 | 16:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एका वयोवृद्ध व्यक्तिचं एमआरआय करण्यासाठी टेक्निशियनने एमआरआय मशीनमध्ये ठेवलं आणि त्यांना बाहेर काढण्याचंच ते विसरुन गेले. हा धक्कादायक प्रकार हरियाणातील पंचकूला येथे घडला आहे.

mri machine man stuck inside haryana hospital trending viral news
MRI मशीनमध्ये रुग्णाला ठेवल्याचंच टेक्निशियन विसरले आणि मग... 

थोडं पण कामाचं

  • हरियाणातील पंचकूला येथे घडला धक्कादायक प्रकार
  • वयोवृद्धाला एमआरआय मशीनमध्ये ठेवून बाहेर काढण्यास टेक्निशियन विसरले
  • रुग्णाला बेल्ट बांधल्याने त्याला बाहेर निघण्यास येत होत्या समस्या
  • सुदैवाने हा रुग्ण मशीनमधून बाहेर पडण्यास झाला यशस्वी

पंचकूला: पुन्हा एकदा एका रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. हरियाणातील पंचकूला येथील सेक्टर ६ मधील रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाला एमआरआयसाठी मशीनमध्ये ठेवलं मात्र, या रुग्णाला मशीनमधून बाहेर काढायचंच टेक्निशियन विसरले. बराच वेळ मशीनमध्ये राहिल्याने या वयोवृद्ध रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला त्यानंतर त्याने मशीनमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरु केले. पण अंगावर बेल्ट बांधले असल्यामुळे त्याला मशीनमधून बाहेर निघण्यास जमत नव्हतं. 

या वयोवृद्ध रुग्णाने बराच प्रयत्न केला मात्र, मशीनमधून बाहेर निघता आलं नाही. अखेर त्याने जोर लावून प्रयत्न केला आणि त्यानंतर बेल्ट निघाले. अंगावर बांधलेले बेल्ट निघाल्यामुळे तो रुग्ण मशीनमधून बाहेर निघाला. मिळालेल्या माहितीनुसार, पंचकूला येथील एमआयआय अँड सिटी स्कॅन सेंटरमध्ये वयोवृद्ध रुग्णाला डॉक्टरांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रुग्णाचे नातेवाईक त्यांना घेऊन रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात आल्यावर टेक्निशियनने त्यांना एमआरआय मशीनमध्ये ठेवलं मात्र, त्यांना तेथून बाहेर काढायचंच ते विसरले. 

या धक्कादायक घटनेनंतर वयोवृद्ध रुग्णाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांच्याकडे तक्रार केली आहे. रिपोर्ट्सनुसार, मीडित व्यक्तीने सांगितले की एमआरआय मशीनमधून बाहेर पडण्यास आणखीन ३० सेकंद जरी उशीर झाला असता तर त्याचा मृत्यू झाला असता. तर या प्रकरणी एमआरआय सेंटरच्या इंचार्जने सांगितले की, हे सर्व आरोप निराधार आहेत आणि वयोवृद्ध इसमाला एमआरआय मशीनमध्ये टाकून टेक्निशियन विसरले असा कुठलाही प्रकार घडलेला नाहीये.

एमआयआय सेंटरच्या इचार्ज ने सांगितले की, या वयोवृद्ध रुग्णाला टेक्निशियननेच एमआरआय मशीनमधून बाहेर काढलं. या रुग्णाला एकूण २० मिनिटे स्कॅन केलं होतं. शेवटची दोन मिनिटे शिल्लक असताना हा रुग्ण घाबरु लागला. तर टेक्निशियन दुसऱ्या मशीनमध्ये काही काम करत होता. शेवटचा एक मिनिट शिल्लक असताना टेक्निशियनने पाहिलं की हा वयोवृद्ध रुग्ण मशीनमधून अर्धा बाहेर आला आहे त्यानंतर त्याला टेक्निशियननेच बाहेर काढलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी