Narendra Modi aayo aur is zulm se nijaat dilayo - Watch video of PoK resident that is going viral : नवी दिल्ली : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्य नागरिकांवर अत्याचार सुरू आहेत. पाकिस्तान नागरिकांना अमानवी वागणूक देत आहेत. ही बाब सिद्ध करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील एक नागरिक 'अत्याचारांपासून सुटका करा' अशा स्वरुपाचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करताना दिसत आहे.
मुझफ्फराबाद येथील एका कुटुंबाला स्थानिक प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करुन घराबाहेर काढले आहे. सध्या हे कुटुंब रस्त्यावर भर थंडीत कुडकुडत आहे. या कुटुंबाच्या प्रमुखाने एक व्हिडीओ केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओत कुटुंबप्रमुख स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप करताना दिसत आहे.
पोलीस आणि प्रशासनाने आमचे घर ताब्यात घेतले आहे. आम्हाला काही झाले तर त्याला मुझफ्फराबादचे आयुक्त आणि तहसील जबाबदार असतील; असे व्हिडीत दिसणाऱ्या व्यक्तीने सांगितले. या व्यक्तीने स्वतःची ओळख वसीम मलिक अशी करून दिली आहे. व्हिडीओत वसीम, त्याची पत्नी आणि मुले रस्त्यावर बसलेली दिसत आहेत.
एका बड्या असामीने घर ताब्यात घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस बळाचा वापर केला. यामुळे आम्ही ऐन थंडीत बेघर झालो आहोत; असे वसीम सांगत आहे. पोलिसांनी हजारो कुटुंबांची घरे ताब्यात घेतली आहेत. ही भारताची मालमत्ता आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हीच या आणि ही मालमत्ता ताब्यात घ्या. आमची अत्याचारांपासून मुक्तता करा; असे आवाहन वसीमने पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केले आहे.
जम्मू काश्मीर संस्थानचा भाग असलेल्या गिलगिट बाल्टिस्तानचा कारभार प्रशासकीय सोयीसाठी इंग्रजांनी गिलगिट बाल्टिस्तान एजन्सी नावाच्या संस्थेकडे दिला होता. भारताला स्वातंत्र्य देण्याआधी या संदर्भातला करार रद्द करुन इंग्रजांनी गिलगिट बाल्टिस्तान पुन्हा जम्मू काश्मीर संस्थानशी जोडले होते. जम्मू-काश्मीर संस्थान भारतात विलीन झाले त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत टोळीवाले आणि पाकिस्तानचे सैनिक यांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली होती. या घुसखोरांना पिटाळण्याची प्रक्रिया जोरात सुरू होती.
जम्मू-काश्मीरमधील काही जिल्ह्यांमधून घुसखोरांना पिटाळण्यात आले होते. मात्र गिलगिट बाल्टिस्तान येथील घुसखोरांना पिटाळून लावण्याआधीच पंतप्रधान नेहरू यांनी एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. युद्धबंदीच्या घोषणेचा निर्णय त्यांनी एकट्याने घेतला होता की, त्यावेळचे भारत आणि पाकिस्तानचे व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांच्याकडून दबाव आला होता हे रहस्यच राहिले. पण हा निर्णय झाल्यामुळे गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीर संस्थानचा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. याच भागाला भारत सरकार पाकिस्तान व्याप्त काश्मीर अर्थात POK म्हणते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भान, लष्कराची मर्यादा किंवा अन्य अज्ञात कारणांमुळे असेल पण गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भूभाग असला तरी भारताने अद्याप ताब्यात घेतलेला नाही. मात्र केंद्रातले मोदी सरकार लष्करी कारवाई करुन हा भूभाग ताब्यात घेण्याची शक्यता वाटू लागल्यापासून पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भारताच्या हवामान खात्याने गिलगिट-बाल्टिस्तानमधील हवामानाचे अंदाज वर्तविण्यास सुरुवात केल्यापासून ही अस्वस्थता आणखी वाढली आहे. आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नागरिक जाहीरपणे पाकिस्तान विरोधात बोलू लागले आहेत. ताज्या व्हायरल व्हिडीओमुळे पाकिस्तानची आणखी कोंडी झाल्याचे चित्र आहे.