वेल्लोर (तामिळनाडू): तामिळनाडूच्या वेल्लोर येथील अंबूर रेल्वे स्थानकावर अनेक तासांच्या संघर्षानंतर एका वृद्ध महिलेला ट्रेनच्या इंजिन खालून काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. अनेक तास इंजिन खाली अडकलेल्या महिलेला बाहेर काढणं हे अतिशय जिकरीचं काम होतं. पण अग्निशमन जवानांनी आपलं सगळं श्रेय पणाला लावून तिला बाहेर काढलं. ट्रेन इंजिन चालकाचं असं म्हणणं आहे की, ही महिला रेल्वे ट्रॅकमधून चालत होती. पण जसं तिने इंजिन जवळ आल्याचं पाहिलं तशी ती महिला घाबरुन ट्रॅकमध्येच झोपली.
महिलेला इंजिनच्या खालून बाहेर काढल्यानंतर तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. ज्यामध्ये पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी हे इंजिन खालून महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रचंड संघर्ष करत असल्याचं दिसून आलं. दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारची एक घटना समोर आली होती. ज्यामध्ये प्लॅटफॉर्म पार करत असताना एका धावत्या ट्रेनची महिलेला धडक बसली होती. ही घटना कर्नाटकमधील कालाबुर्गी जिल्ह्यातील चितापूर रेल्वे स्टेशनवर घडली होती.
ही महिला रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न करत असताना अनेक लोकांनी ओरडून महिलेला सर्तक करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या दिशेने वेगाने येणारी ट्रेन पाहून अनेकांनी आरडाओरड करुन महिलेला बाजूला होण्यास सांगितलं. यावेळी, घाईगडबडीत महिलेचा पाय घसरला आणि ती खाली पडली. याचवेळी वेगाने येणारी ट्रेन तिच्यावरुन गेली. पण सुदैवाने ती महिला बचावली. कारण की, त्यावेळी महिला ट्रॅकच्या मधोमध पडली होती.
मुंबईत देखील अनेकदा रेल्वे अपघात होत असल्याचं नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतं. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे ट्रॅक न ओलांडण्याचं आवाहन नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतं. मात्र, अनेकजण त्याकडे कानाडोळा करतात. त्यामुळेच अशाप्रकारचे अपघात होता. मात्र, प्रवाशांनी स्वत: काळजी घेतल्यास अशाप्रकारच्या अपघाताना नक्कीच आळा बसू शकतो. त्यामुळेच प्रवाशांनी आपल्या जीवाची काळजी स्वत:च घेणं गरजेचं आहे.