Video : नाशिकमध्ये 1 रुपयांत टोमॅटो; भाव घसरताच शेतकरी संतापले, रस्त्यावर फेकला टोमॅटो

Nashik News : महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात धक्क्दायक घटना घडली. 20 किलो टोमॅटोला 1 रुपया दर मिळू लागला. भाव एवढा घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी राग अनावर झाल्यावर आपल्याकडे असलेला सगळा टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायला सुरुवात केली. यामुळे रस्त्यावर लाल चिखल झाला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

Updated May 21, 2023 | 12:40 PM IST

farmers in maharashtras nashik destroy their tomato crop after getting just rs 1 per kg

farmers in maharashtras nashik destroy their tomato crop after getting just rs 1 per kg

Nashik News : महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात धक्क्दायक घटना घडली. कृषी उत्पन्न बाजारात टोमॅटोची विक्री सुरू असताना दर गडगडला. 20 किलो टोमॅटोला 1 रुपया दर मिळू लागला. भाव एवढा घसरल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. शेतीसाठी झालेला खर्च तर दूरच राहिला साधे येण्याजाण्याचे भाडे पण निघणार नाही एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली. मागणीच्या तुलनेत जास्त प्रमाणात टोमॅटो उपलब्ध झाल्यामुळे दर घसरला असे व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. तर या भावाने टोमॅटो विकून काय मिळणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत होते.
संतापलेल्या शेतकऱ्यांनी राग अनावर झाल्यावर आपल्याकडे असलेला सगळा टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायला सुरुवात केली. यामुळे रस्त्यावर टोमॅटोचा खच पडला. एकावर एक धडाधड टोमॅटो पडू लागले. यामुळे रस्त्यावर लाल चिखल झाला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसेच व्हॉट्सअॅपसह अनेक मेसेजिंग अॅपवर हा व्हिडीओ फिरत आहे. व्हायरल व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
देशात याआधीही अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेळा मागणीच्या तुलनेत जास्त पुरवठा झाल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी मातीमोल भावाने खरेदी सुरू केली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी माल रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. ही वेळ येऊ यासाठी केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे केले होते. या कायद्यांद्वारे शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळणार असल्याचे केंद्र सरकार सांगत होते. शेतकरी त्याच्या इच्छेनुसार शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा खासगी व्यापारी यापैकी कोणालाही विकू शकेल आणि त्याच्या कष्टाचा जास्तीत जास्त मोबादला मिळवू शकेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे होते. पण हे कायदे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आहे, भविष्यात खासगी कंपन्या या कायद्यांच्या माध्यमातून शेतजमिनी गिळंकृत करतील अशी भीती काही शेतकरी संघटनांनी व्यक्त केली. यात प्रामुख्याने पंजाब, हरयाणा येथील शेतकरी होते. पुढे या मुद्यावरून राजकारण तापले आणि कोरोना काळात केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. आज हे कायदे अस्तित्वात नाहीत. पण शेतकऱ्यांचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
व्हायरल व्हिडीओवरून चर्चेला उधाण आले आहे. काही जण सरकारने या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी करत आहेत तर काही जण सरकार या विषयात किती हस्तक्षेप करणार असा प्रश्न उपस्थित करत आहेत. काही अभ्यासकांनी शेती उत्पादनाचे व्यावसायिक पद्धतीने नियंत्रण करण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे असे मत मांडले आहे. तर काही जण हे मत म्हणजे पुन्हा शेती क्षेत्रात खासगी कंपन्यांना मोकळे रान देण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत आहेत.
चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी टोमॅटोच्या गडगडलेल्या दरांमुळे जे शेतकरी हवालदिल झाले त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. टोमॅटोचा लाल चिखल व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. पण शेतकऱ्यांपुढील अनिश्चिततेचे संकट कायम आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited